
सांगली – पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची काळजी घेणार. पॅकेज घोषित करणार नाही. तत्पूर्वी नुकसानीचा संपूर्ण आढावा घेऊ असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील दौऱ्यावेळी केलं आहे. सांगलीतील पलूस येथील भिलवडी येथे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे स्थलांतर केले. कुठलीही जीवितहानी होणार नाही याकडे प्राधान्य दिलं. विश्वजित कदम यांच्याकडून माहिती घेतली आहे. लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळिये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे, नुकसान पाहिले आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच किती नुकसान झाले आहे त्याची सगळी आकडेवारी मिळते आहे. शेती, घरेदारे एकूणच किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सुरू आहे. काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील , आपली त्याला तयारी हवी. कारण दरवर्षी हे पुराचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की परत दुसऱ्या वर्षी तेच होणार. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे, ते करणार असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, अशी काही आपत्ती आल्यास, काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू. नुकसानीचा आढावा घेऊन मदत देऊ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
कोल्हापूर, सांगलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.




