पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांत ‘कडक लॉकडाऊन’

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येने लाखोंचा आकडा पार केला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परंतु या लॉकडाऊन दरम्यानही कोरोना रुग्णसंख्या थांबण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर आता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, बारामती, पुणे आणि आता कोल्हापुरात पुढील ७ ते १० दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीत पुढील ७ दिवस तर कोल्हापुरात पुढील १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन असणार आहे, त्याचप्रमाणे बारामतीतही उद्यापासून पुढीस ७ दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने दीड हजारांचा आकडा ओलांडला आहे तर सोमवारी तब्बल ४० रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात १५ मे पर्यंत लॉकडाऊन
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यात गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्येत घट झाली असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांचा दर कमी झालेला नाही. सध्या कोल्हापूरात २४०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे कोल्हापूरतही ५ मे च्या सकाळी ११ वाजल्य़ापासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. थोड्याच वेळातच यासंदर्भातील नियमावली जारी केली जाणार आहे. यापूर्वी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काही दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी होती. मात्र आता अत्यावश्यक सेवेतील दुकांनाच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बारामतीत ७ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन
बारामती जिल्ह्यातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे बारामतीतही बुधवारपासून ( ५ मे) पासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बारामती प्रशासनाने ५ ते ११ मे दरम्यान बारामतीत कडक लॉकडाऊन घोषित केला.



