
मुंबई : सध्या राज्यातील भाजप-शिवसेना संघर्ष चांगलाच पेटल्याचे दिसत आहे. दोन्हीही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे आणि आरोपप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्य, राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आखाडा बनले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे बार झडत आहेत. असे असतानाच केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेत गंभीर आणि काही खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी, दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे.
दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली, पण आत्महत्या झाल्याचे दाखवण्यात आले. दिशा आत्महत्या का करेल? असे म्हणत राणे यांनी, दिशा सालियानचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट का आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची तेथील रजिस्टरची पानं का फाडली गेली? असे प्रश्न उपस्थित केले. एवढेच नाही तर, जेव्हा सुशातंसिंह राजपूतला हे प्रकरण समजले, तेव्हा मी यांना सोडणार नाही, असे सुशांत म्हणाला होता. यानंतर, त्याच्या घरात बाचाबाची झाली. त्यातून सुशांतसिंह राजपूत याचीही हत्या झाली, असा दावाही नारायण राणे यांनी यावेळी केला.
सुशांतच्या हत्येचा दावा करतानाही, सुशांतच्या सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब झाले? ठराविक माणसाची रुग्णवाहिका कशी आली? रुग्णालयात कसे नेले गेले, पुरावे कुणी नष्ट केले? असे सवाल खडे करत, या सर्वांची चौकशी होणार, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. याच वेळी त्यांनी रमेश मोरेची हत्या कुणी केली आणि का केली? असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच, मर्डर केस कुणालाही पचवता येत नाही आणि ती कधीच क्लोज होत नाही, असेही राणे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले, मला राजकारण शिकवू नये. कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही, पण दुसरा कुणी असता तर राजीनामा दिला असता. यावर, ते थांबले नाही, तर शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे असेल तर लोककल्याणकारी कामे करा. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, कॅबिनेटमध्ये जात नाहीत, सभागृहात जात नाहीत. कोरोनात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त दीड लाख लोक येथे मेले आणि हे म्हणतात आमचं कर्तृत्व. एवढे मेले त्याचे काही वाटत नाही, असेही राणे यावेळी म्हणाले.
शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर !
घराबद्दल नोटीस मिळाली असं मला अनेकांनी विचारलं. जे काही वास्तववादी चित्र आहे ते सांगावं असं मी ठरवलं. या घरात मी १७ सप्टेंबर २००९ मध्ये आलो. ही इमारत नामांकित आर्किटेक्टनं बांधली. या इमारतीला ऑक्युपेशन, कम्पलिशन सर्टिफिकेट महापालिकेनं दिल्या होत्या. घर घेताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. घर घेतल्यानंतर एक इंचही अधिक बांधकाम करण्यात आलेलं नाही. आम्ही या घरात ८ माणसं राहतो. ही १०० टक्के रहिवासी इमारत आहे. १०० टक्के कायदेशीर इमारत असताना शिनसेनेकडून, मातोश्रीकडून काही लोकांना सांगून तक्रार करायला लावण्याचं काम केलं. पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्यानं तक्रारी करायच्या आणि तपासून काही अनधिकृत नाही असंही सांगायचे, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मूळावर उठलेत. मी सैनिक, पदाधिकारी म्हणणार नाही. त्यांनी मातोश्री १ दुरुस्त केला. मातोश्री २ बांधला, आम्ही काही म्हणालो नाही. सत्ता असताना त्यांनी त्यांनी पैसे भरुन बेकायदेशीर रेग्युलराईज करून घेतलं. दोन्ही घराचे प्लॅन माझ्याकडे आहेत. परंतु मी कधी कोणाच्या घरावर किंवा नोकरीवर काहीही बोललो नाही, असं राणे यावेळी म्हणाले.
राजकीय सुडबुद्धीनं अशा प्रकारे तक्रारी करण्याचं सातत्य ठेवलंय. एखाद्यानंही कधी येऊन चांगलं घर असल्याचं कौतुक केलं नाही. बाळासाहेब ठाकरे असताना मी प्लॉट घेतला होता. त्यांना तिकडे घर बांधणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी अभिनंदनही केलं. ते असते तर पहिल्या प्रवेशाला १०० टक्के आले असते. परंतु काही सुडबुद्धीचे लोकं सत्तेवर आहेत हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.
गुणवत्ता नसतानाही सव्वादोन वर्ष काढली ही बाळासाहेबांची पुण्याई आहे. ते असे नव्हते. आमच्याकडे पाहिल्यावर त्यांना आनंद वाटत होता, असंही ते म्हणाले.




