
अफगाणिस्तान आता तालिबानची सत्ता आली आहे.परत एकदा अफगाणिस्तान मधील स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालिबान्यांच्या अत्याचाराला सर्वाधिक बळी तेथील स्त्रिया पडल्या. तालिबानने महिलांचे हक्क अबाधित राहतील, असा दावा केला आहे. तरीही या सरकारमध्ये २० वर्षांपूर्वी महिलांची स्थिती काय होती आणि आताही ती तशीच राहणार का? याबाबत भीती व्यक्त केली जात आहे. आता तालिबानी महिला स्वातंत्र्याबाबत खरंच उदार होणार की हा फक्त एक देखावा आहे? हे समजून घेण्याची गरज आहे.
तालिबानच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष सध्या अफगाणिस्तानकडे आहे. तालिबानने पुन्हा डोकं वर काढत संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय. त्यामुळे पुन्हा एकदा तेथे शरिया कायदा लागून महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे. विशेष म्हणजे हे पहिल्यांदाच घडत नाहीये. याआधी देखील तालिबानने १९९६-२००१ मध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. तेव्हा महिलांवर अनेक निर्बंध आले होते. आता पुन्हा असं निर्बंध लादले जात आहेत
सध्या तालिबानच्या आक्रमणासह अफगाणिस्तानमधील महिलांच्या सामाजिक स्थितीविषयीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. यात तालिबानपूर्वीचा अफगाणिस्तान आणि नंतरची स्थिती असं दाखवलं जातंय. तालिबानचं वर्चस्व असलेल्या भागात महिलांची तालिबानी कट्टरतावाद्यांशी जबरदस्तीने लग्नं लावली जात आहेत. महिलांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावले जात आहेत. केवळ पुरुषासोबतच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात येत आहे. असं असलं तरी अफगाणिस्तानमधील परिस्थिती कायम अशीच नव्हती. एकेकाळी हा देश फॅशन, रोजगार आणि करिअरबाबत खूप पुढे होता. सोशल मीडियावर तालिबानच्या नियंत्रणाआधी महिलांचे आधुनिक वेशातील काही फोटो व्हायरल होत आहेत च्या दशकात एका महिलेने फॅशनेबल कपडे घातलेले दिसत आहेत.
दरम्यान ४ दशकं सुरू असलेल्या तालिबान्यांच्या युद्धानंतर परिस्थिती प्रचंड बदलली आहे. सध्या महिलांना विना बुरखा राहणं शक्य नाहीये विधवा महिलांचं स्थान तर अगदी धोक्यात आलंय, कारण तालिबान्यांच्या नजरेत विधवा स्त्रीयांना कोणतंही सामाजिक स्थानक नाहीये. तालिबानच्या राजवटीत यापूर्वी १९९६-२००१ च्या काळावधीत महिलांना नोकरी करण्यास मनाई होती. कोणत्याही मुलींना शाळेत किंवा कॅालेज मध्ये प्रवेश घेता येणार नाही, महिला बुरखा परिधान करुन घराच्या बाहेर पडू शकतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या पुरुषांसोबत बोलण्यास महिलांना परवानगी देखील नव्हती. हे निर्बंध २००१ पर्यंत तालिबानची सत्ता कायम असेपर्यंत होते. महिलांना बुरखा सक्तीसह शिक्षण बंदी करण्यात आली होती. या दरम्यानच्या राजवटीत महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून समजले जात होते. महिलांच्या शोषणातही वाढ झाली होती. या दरम्यान तालिबानने शरिया कायदा लागू केला. यानुसार महिलांना शाळेत जाणं बंद केलं, शिक्षणावर बंदी घातली, नोकरीवर बंदी घातली, पुरुषाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घातली, सार्वजनिक ठिकाणी शरीराचा कोणताही भाग दिसू नये असं फर्मान काढलं, राजकारणात प्रवेशावर बंदी घातली, महिलांना पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यास बंदी घातली. त्यामुळे उपचाराअभावी महिलांच्या आरोग्यावर याचा घातक परिणाम झाला.
अफगाणिस्तान मध्ये महिलांबाबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, असं तालिबान प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी स्पष्ट केले. शरियतच्या आधारावर महिलांना स्वातंत्र्य देणार असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. राज्यात महिलांना संधी देण्यात येणार आहे. महिला आरोग्य आणि अन्य क्षेत्रातही आवश्यकतेनुसार काम करू शकतात. महिलांसोबत भेदभाव होणार नसल्याची ग्वाही तालिबानने दिली.मात्र तालिबनाने महिलांकडे कोणतेही पद दिले नाही.महिलांना सोबत उदार भूमिका घेण्याचं केवळ हा देखावा करून तालिबानने आपली बुरसटलेले मानसिकता परत एकदा दाखवून दिली आहे.
तालिबानी महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत असले तरी तालिबानच्या कथनी व करणी मध्ये फरक आहे. शरियतच्या आधारावर महिलांना स्वातंत्र्य देणार असल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्ट केल्याने तालिबानी खरंच महिलांना स्वातंत्र्य देणार का.? तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा केल्यानंतर, शरिया कायद्याअंतर्गत महिलांना स्वातंत्र्य देण्यात येईल, असं तालिबानने जाहीररित्या भूमिका मांडली आहे. अफगाणिस्तानातील महिलांमध्ये तालिबानने मांडलेल्या भूमिकेबद्दल महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. परंतू महिलांना शरिया कायद्य़ाचे पालन करावे लागणार. असल्याने महिलांवर होणारे अत्याचार थांबतील का असा प्रश्न तेथील महिलांनी केलेला आहे.एका महिला पत्रकारालाही कार्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. अनेक महिलांनी तालिबानच्या भीतीने बंदीस्त करुन घेतले आहे.
तालिबानने काही दिवसांपूर्वी त्यांच्या ताब्यात येत असलेल्या प्रांतांच्या मौलवींकडून ठिकठिकाणच्या १५ वर्षांवरील तरुणी आणि विधवा महिलांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते. तसेच तालिबानचे दहशतवादी घरोघरी जाऊन तरुणींचा शोध घेत होते. या महिलांना उचलून नेत सेक्स गुलाम बनविले जात होते. तालिबानचे हे कृत्य इराक आणि सीरियामध्ये असलेल्या इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेसारखेच आहे. ही संघटना महिलांना सेक्स गुलाम बनविण्यासाठी कुख्यात आहे. तेथील काही महिलांनी कशीबशी सुटका करून घेऊन आयएसआयएस दहशतवाद्यांच्या कृत्याचा भांडाफोड केला होता.
आता तालिबानने मागविलेल्या यादीतील मुलींना तालिबानच्या दहशतवाद्यांशी लग्न करावे लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय दबाव कमी होताच तालिबानने हिंसा करण्यास सुरुवात केली आहे. अफगानिस्तानमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. तालिबानने तरुणी आणि विधवा महिलांची यादी मागविली होती. यावर अद्याप मौलवींनी काम केले की नाही याची माहिती उपलब्ध झालेली नाही. जबरदस्तीने लग्ने लावली तर या महिलांना पाकिस्तानच्या वजीरीस्तान येथे नेले जाईल आणि पुन्हा त्यांना प्रशिक्षण देऊन प्रामाणिक इस्लाममध्ये परावर्तित केले जाईल,अशी भीती तेथील महिलांमध्ये निर्माण झाल्याने महिला आता तालिबान्यांच्या अत्याचारविरुद्ध रस्त्यावर उतरल्या आहेत.तालिबान्यांच्या या सर्व कृतीतीतून काय स्पष्ट होते..? तालिबानी महिलांचा आदर तर सोडाच महिलांना केवळ गुलाम म्हणून ठेवू इच्छितात.. महिलांनी केवळ मुलांना जन्म द्यावा,राजकारणात महिलांची आवश्यकता नाही.महिलांना स्वातंत्र्य व इतर क्षेत्रात काम करू देण्याची भाषा बोलणाऱ्या तालिबांचा अस्सल चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
शरिया कायदा काय आहे?
शरियाला इस्लामिक कायदा असेही म्हणतात. शरिया ही कुरान, हदीस आणि पैगंबर मुहम्मद यांच्या सुन्नावर आधारित नैतिक आणि कायदेशीर चौकट आहे. जर सोप्या भाषेत समजले तर शरियाला इस्लामिक कायदे आणि चालीरीतींनुसार जीवनशैली म्हणता येईल.ते एका उदाहरणासह समजून घ्या- भारतात चोरीची शिक्षा संविधान किंवा आयपीसीच्या तरतुदींच्या आधारे ठरवली जाते. जिथे शरिया कायदा लागू आहे, तिथे चोरीची शिक्षा कुराण आणि पैगंबरांनी सांगितलेल्या पद्धतींद्वारे निश्चित केली जाईल.




