
नवी दिल्ली: देशातील सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. जर येत्या काळात राजकीय वादळ निर्माण झालं तर त्याला कुणीच थांबवू शकत नाही. ‘खेला होबे’चा नाद आता संपूर्ण देशात घुमणार आहे. आतापर्यंत ‘अच्छे दिन’ची वाट खूप पाहिली, आता आम्हाला ‘सच्चे दिन’ पाहायचे आहेत. माझे सर्वच विरोधी पक्षनेत्यांशी चांगले संबंध आहेत. जर राजकीय वादळ उठलं तर त्याला कोणीच रोखू शकणार नाही. आता ‘खेला होबे’ची ललकार संपूर्ण देशात ऐकायला मिळेल, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात एल्गार पुकारला.
ममता बॅनर्जी यांनी आज राजधानी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संसदेतही काम होत नाही. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे, अशी घणाघाती टीका करतानाच सर्व विरोधक एकत्रित आल्यास सहा महिन्यातच चांगले परिणाम दिसतील, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
दिल्लीत राजकीय पक्षांच्या भेटीगाठी घेत असतानाच ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपवर वार करण्यास सुरुवात केली आहे. माझा फोनही हॅक करण्यात आला होता. अभिषेक आणि निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांचा फोनही हॅक करण्यात आला होता. फ्रिडम ऑफ प्रेसही उरलेलं नाही, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. पेगासस हा एक खतरनाक व्हायरस आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे. संसदेचं काम सुरू नाही. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. सध्या तरी आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे, असं त्या म्हणाल्या.
अधिवेशनानंतर सर्वांशी बोलणार
विरोधी पक्षांनी एकत्र यावं का? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ही संपूर्ण सिस्टिमच राजकीय पक्षांवर अवलंबून आहे. कोणी त्याचं नेतृत्व करत असेल तर मला काहीच अडचण नाही. माझं मत कुणावर मला थोपवायचं नाही. अजून अनेक राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. संसदेच्या अधिवेशनानंतर सर्व राजकीय पक्षांशी मी स्वत: बोलणार आहे.
सोनिया, केजरीवाल यांना भेटणार
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, आपचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मी भेट घेणार आहे. तसेच लालूप्रसाद यावद यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. सर्व लोक एकत्र यायला तयार आहेत. विरोधकांनी एकत्र यावं असं सोनिया गांधी यांनाही वाटतं. त्यांच्याशी भेट घेऊन यावर चर्चा करणार आहे. विरोधकांनी एकत्र येण्यावर गंभीरपणे विचार केला तर सहा महिन्यातच त्याचे परिणाम दिसतील, असंही त्या म्हणाल्या.
विरोधी पक्षाचं कमान तुम्ही सांभाळणार का? असा विचारण्यात आलं असता, मी काही राजकीय ज्योतिषी नाही. हे पूर्णपणे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आज मी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चर्चा करणार आहे, असे त्या म्हणाल्या. विरोधी पक्षाचं गणित हे राजकीय पक्षांवर अवलंबून आहे. जर कुणी याचं नेतृत्व करणार असेल तर मला काहीच हरकत नाही. मी कुणावरही माझं म्हणणं लादू इच्छित नाही. सध्या अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याबाबत संसदीय अधिवेशनानंतर प्रमुख पक्षांसोबत बैठक घेऊन चर्चा करू, असं ममता म्हणाल्या.




