राजकारण

पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपला फटका

निवडणूक निकालाचा शेतकर्‍यांच्या आंदोलनाशी संबंध जोडणं चुकीचं : तोमर

नवी दिल्ली – पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भाजपाला पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसला. तसेच निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या दारूण पराभवावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं आहे. निवडणूक निकालाचा संबंध शेतकर्‍यांच्या आंदोलनाशी जोडणं चुकीचं आहे. पंजाबमध्ये आमची स्थिती कमकुवत होती असं म्हणत यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.

“आम्ही याआधी अकाली दलाबरोबर युती करून निवडणुका लढवायचो. पण आम्ही यावेळी स्वबळावर निवडणूक लढवली असून यामुळे निवडणुकीत पक्षाचं नुकसान झालं आहे” असं नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं. यासोबतच त्यांनी आसाममधील विधानसभा निवडणुकांसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला देखील उत्तर दिलं आहे. “आसाममधील जनमत सरकारच्या बाजूने आहे. राज्यात प्रो इनकंबेन्सी आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा अधिक जागा जिंकेल. मागील सरकारमध्ये जे घडलं ते आसामच्या जनतेने पाहिलं आहे. तसेच भ्रष्टाचार शिगेला पोचला होता. विकासाचा पत्ताच नव्हता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट होती.”
“आसाममध्ये अँटी इनकंबेन्सीऐवजी प्रो-इनकंबेन्सी पाहायला मिळत आहे. हे भाजपासाठी एक चांगलं चिन्ह आहे आणि आशा आहे की भाजपा पुन्हा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल” असा दावा तोमर यांनी केला आहे. आसामचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या पाच वर्षे जनतेची सेवा केली आहे. आसाममध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था स्थापन झाली आहे. त्यांनी विकासाला प्राधान्य दिलं आहे असं नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात मोठा विजय मिळवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button