Top Newsराजकारण

सायकलचं बटण दाबल्यानंतर कमळाला मत दिल्याची स्लिप !

व्हिडिओ ट्विट करत समाजवादी पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

लखनऊ : उत्तर प्रदेशात सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. यात मतदान यंत्रात गडबड केल्याचा आरोप समाजवादी पक्षानं केला आहे. मतदानावेळी मतदारानं सायकल चिन्हाचं बटण दाबूनही त्यांना कमळाला मत दिल्याची स्लिप (चिठ्ठी) मिळत असल्याची तक्रार समाजवादी पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली. सपानं मुरादाबादमधील एका मतदाराचा व्हिडिओ देखील याचा पुरावा म्हणून ट्विट केला आहे. तसंच निवडणूक आयोगानं यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी देखील समाजवादी पक्षानं केली आहे. सायकल चिन्हाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत दिल्याची चिठ्ठी मतदारांना प्राप्त होत असल्याचा आरोप करणारा एका मतदाराचा व्हिडिओ समाजवादी पक्षानं ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.

समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. मुरादाबाद ग्रामीण विधानसभा २७, बूथ क्रमांक ४१७ वर सायकल चिन्हावर बटण दाबूनही कमळाला मतदान दिल्याची चिठ्ठी मतदारांना मिळत आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण असून यात निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनानं माहिती घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, असं समाजवादी पक्षानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

समाजवादी पक्षानं रामपूरमध्ये बूथ ताब्यात घेण्यात आल्याचाही आरोप केला आहे. तसंच याआधी सहारनपूर जिल्ह्यातील बेहट विधानसभा मतदार संघाच्या बूथ क्रमांक १७० वर सायकल चिन्हाचं बटण दाबल्यानंतर कमळाची स्लिप येत असल्याचा आरोप केला होता.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान होताच अखिलेश यांचा १०० जागा जिंकल्याचा दावा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी मतदान झाले. त्यानंतर आता या जागांवर विजयाबाबत सर्वच नेत्यांनी आपापले दावे केले आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दोन्ही टप्प्यात जनतेचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षेचा उल्लेख करून जनतेचे आभार मानले आहेत. दरम्यान, दोन्ही टप्प्यात समाजवादी पार्टीने जागा जिंकण्याचे शतक पूर्ण केल्याचा दावा देखील अखिलेश यांनी केला आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच अखिलेश यादव यांनी ट्विटरवर जनतेचे आभार मानले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जनतेचा पाठिंबा पाहता सपा आघाडीने जागा जिंकण्याचे शतक पूर्ण केल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. दोन्ही टप्प्यात मिळालेल्या जनतेच्या १०० टक्के पाठिंब्याबद्दल त्यांनी जनेतेचे आभार मानत जनता भाजपला परत जा, असे सांगत असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनीही ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, लोकशाहीच्या महायज्ञात सर्वांनी मतदानाा हक्क बजावल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानलेत. निवडणुकीतील तुमचा उत्साह तुमची जागरूकता दर्शवत आहे. तुमचे मत उत्तर प्रदेशातील सुरक्षेसाठी आणि समृद्धीच्या प्रवासाला नवी गती देईल असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

सोमवारी उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यातील तर उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा जागांसाठी मतदान झाले. तिन्ही राज्यात मिळून आज एकूण १६५ जागांसाठी मतदान झाले. यासाठी १ हजार ५१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यूपीमधील ५५ विधानसभा जागांसाठी ५८६ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते तर उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी ६३२ आणि गोव्यातील ४० जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button