स्पोर्ट्स

दिग्गज हॉकी खेळाडू चरणजित सिंग यांचे निधन

नवी दिल्ली: १९६४ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे ज्येष्ठ हॉकी खेळाडू आणि माजी कर्णधार चरणजित सिंग यांचे निधन झाले. आज पहाटे ५ वाजता वयाच्या ९२ व्या वर्षी हिमाचलमधील उना येथे अखेरचा श्वास घेतला.

चरणजीत काही दिवसांपासून आजारी होते. चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९६४ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. चरणजीत यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीनेही गौरविण्यात आले आहे. चरणजीत सिंग यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३० रोजी हिमाचल प्रदेशातील उना येथील मेरी गावात झाला. त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि ब्राउन केंब्रिज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. निवृत्तीनंतर चरणजीत यांनी हिमाचल विद्यापीठात शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले. १९६४ व्यतिरिक्त, १९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या संघाचेही ते सदस्य होते.

१९४९ मध्ये चरणजीत सिंग पंजाब विद्यापीठाच्या हॉकी संघात सामील झाले होते. त्यांची कामगिरी पाहून त्यांना विद्यापीठ संघाचा कर्णधार बनवण्यात आले. हळूहळू चरणजीत यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर चमकले आणि १९५० मध्ये त्यांची भारतीय हॉकी संघात निवड झाली. १९५१ मध्ये चरणजीत भारतीय संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावरही गेले होते.

रोम ऑलिम्पिकसाठी चरणजीत यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी दुखापत झाल्याने ते विजेतेपदाचा सामना खेळू शकले नाही. अंतिम फेरीत भारताचा पराभव करत पाकिस्तानने सुवर्णपदक जिंकले. १९६१ मध्ये चरणजीत भारतीय हॉकी संघाचे उपकर्णधार बनले. 1962 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या टीम इंडियाचेही ते भाग होते. यासाठी त्यांना १९६३ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१९६४ मध्ये चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आणि १९६० च्या ऑलिम्पिकचा बदला पाकिस्तानकडून घेतला. विजेतेपदाच्या लढतीत भारताने पाकिस्तानचा १-० असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर चरणजीत यांना १९६४ मध्येच सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button