
नाथाभाऊंच्या ‘पोलिटिकल ब्रेकअप’नंतर नवीन ‘पोलिटिकल लिव्ह इन रिलेशनशिप’च्या सुरुवातीचा शानदार सोहळा सुरू आहे. स्वतः मोठे साहेब जातीने हजर आहेत. प्रत्यक्षात सर्वेसर्वा असलेले मोठे साहेबच शेजारी बसलेले असल्यामुळे नाथाभाऊंची छाती (जरी त्यांनी ‘छत्तीस इंच’वाल्याशी ब्रेकअप घेतला असला तरी) फुगून चाळीस इंचाची (न फुगवून अडतीस इंच) झाली आहे. आपण किती जिगरबाज माणसाला पक्षात घेतला आहे, ते आपल्या नवीन साहेबांना कळावं म्हणून नाथाभाऊ बोलून जातात, ‘एकदा मला जयंत्रावांनी सांगितलं की, तुम्ही आमच्याकडे आलात तर तुमच्या मागे ईडीफिडी लागेल ना? मी सांगितलं, मी काही तसा लेचापेचा नाहीये. त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल ! लावायची की नाही ?’ मोठे साहेब गालातल्या गालात (गूढ) हसतात. समोर बसलेले कार्यकर्ते, ‘लावायची लावायची’ म्हणून ओरडतात. क्षणभरात तो गलका शांत होतो आणि नाथाभाऊ मनातून चमकतात. दहाबारा वेळा पाहिलेल्या ‘शोले’तला विरु -जयचा डायलॉग त्यांना आठवतो.
‘ पार्टनर, मै कुछ जादा तो नही बोल गया ?’
‘ पार्टनर, जब बोल ही गया है तो देख लेंगे .’
कपाळावर जमा झालेले धर्मबिंदू पुसण्यासाठी ते खिशातून रुमाल काढतात.
—
आज सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचं समन्स मिळूनही नाथाभाऊ शांत आहेत. ते ‘सीडी’वाल्याला फोन लावतात. समोरून फोन उचलला जात नाही. परत लावतात. परत उचलला जात नाही. परत लावतात. आता पलीकडून फोन उचलला जातो.
नाथाभाऊ – कारं भो, तुबी का फक्त पोरींचेच फोन उचलतो का, तुझ्या आमदारावानी ?
‘सीडी’वाला – (ओशाळत) नाही हो भाऊ, आपल्याला तसं करून कसं चालल ? पेप्रात बातमी वाचली तुमले त्या ‘ईडी’वाल्यांनी बलवल्याची, म्हनलं आता भाऊंना सीडी लागल. तीच शोदीत हुतो.
नाथाभाऊ – सापडली का मंग ?
‘सीडी’वाला – सापडल की. शोदून लगीच पाटवितो.
नाथाभाऊ – झटपट पाठव रे भो. पत्रकार परिषद ठेवलेली आहे. तिथे दाखवतो ती सीडी , म्हंजे मंग ते ‘ईडी’वाले बसतील बिडी फुंकत !
‘सीडी’वाला – दा मिंटात पाटवितो भाऊ.
—
नाथाभाऊ आपल्या पीएला बोलावून सूचना देतात, ‘हे बघा, आधी बातमी सोडा, की तब्येत बरी नसल्याने नाथाभाऊ कदाचित आज ईडीच्या कार्यालयात जाणार नाहीत म्हणून. अकरा वाजता पत्रकार परिषद बोलवा. पत्रकार परिषदेत ‘ती सीडी’ दाखवू आणि मग ईडीकडे वकील पाठवून चवदा दिवसांचा वेळ मागून घेऊ. आपण सीडी दाखवली की मोठा धमाका होईल. मग बसतील ते ‘ईडी’वाले बिडी पीत. परत बोलवायचंच विसरून जातील. काय ?’ पीए ‘यस सर’ म्हणून निघून जातो.
थोड्याच वेळात एक माणूस येऊन नाथाभाऊंना सीडी देऊन जातो. नाथाभाऊ उतावीळपणे सीडी हातात घेतात आणि शेजारी उभ्या असलेल्या नोकराला सीडी लावायचा हुकूम सोडतात. तो सीडी लावतो. सीडीतून स्वर बाहेर पडतात –
चल अकेला चल अकेला चल अकेला
तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला
हजारों मील लम्बे रास्ते तुझको बुलाते
यहाँ दुखड़े सहने के वासते तुझको बुलाते
है कौन सा वो इंसान यहाँ पर जिसने दुःख ना झेला
चल अकेला…
तेरा कोई साथ ना दे तो खुद से प्रीत जोड़ ले
बिछौना धरती को करके अरे आकाश ओढ़ ले
यहाँ पूरा खेल अभी जीवन का तुने कहाँ है खेला
चल अकेला…
नाथाभाऊ डोकं पकडून मटकन खाली बसतात.
—
आधी बोलावलेली पत्रकार परिषद घाईघाईने रद्द करण्यात येते. मुदत मागण्याचा अर्ज देऊ नका म्हणून वकिलाला फोन केला जातो. नाथाभाऊ बाहेर सीडीची वाट पाहत जमलेल्या पत्रकारांसमोर आपल्यावर अन्याय झाल्याची तीच जुनी कॅसेट वाजवतात आणि गाडीत बसून ईडीच्या कार्यालयाकडे रवाना होतात. गाडीत गाणे वाजत असते,
‘तेरेे जीवन का हैै कर्मोंसे नाता
तुही तेरा भाग्य विधाता
देना होगा तिल तिल का लेखा’




