लसींचा तुटवडा; मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरण बंद
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मुंबईकर लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. मात्र, लसींचा तुटवडा जाणवत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस लसीकरण बंद राहील. तीन दिवस लसीचा साठा मिळणार नाही त्यामुळे आम्हाला लसीकरण करता येणार नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला लस उपलब्ध व्हावी. लस मिळाली तर आम्ही शॉर्ट नोटीसवर लोकांना कळवू आणि लसीकरण सुरू करु, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या लसीकरण केंद्रांची ई संख्या वाढवणार आहोत. खाजगी कार्यालये, मोठ्या हौसिंग सोसायटी इथे आम्ही नवीन टप्याचे लसीकरण सुरू करणार आहोत. आपण टेस्टिंग तेव्हा वाढवले होते जेंव्हा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्यावेळी बाजार, ट्रेन सगळं सुरू होती. आता या सगळ्या गोष्टी लॉकडाऊन मुळे कमी झाल्या आहेत. आपण पॉझिटिव्ह लोकांचे सर्व जवळचे लोक टेस्टिंग करत आहोत असंही सुरेश काकाणी यांनी सांगितलं.
आमच्या टीम प्रत्यक्ष रुग्णाच्या घरी जाऊन पाहणी करते. त्यामुळे कोणाला कोणता बेड हवा आहे हे ठरवले जाते. आमच्याकडे ऑक्सिजन बेड आहेत. इतर बेड आहेत. आम्ही आयसीयू बेड वाढवत आहोत. आपल्याकडे 2800 आयसीयू बेड तयार झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं.
लसीकरण मोहिमेचा बोजवारा
मुंबईत लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. अनेक केंद्रा-केंद्रावर नागरिकांची भांडण होताना बघायला मिळत आहे. १२ वाजल्यापासून लसीकरण सुरू होणार असले तरी नागरिकांनी मात्र सकाळपासूनच रांगा लावलेल्या आहेत. बुधवारी सुद्धा मुंबईच्या अनेक केंद्रांवर मर्यादित साठा उपलब्ध असल्यामुळे हजारो लोकांना माघारी परतावे लागले होते. बुधवारी रात्री मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतर आज आपल्याला लसीकरण करता येईल या उद्देशाने नागरिक वेगवेगळ्या केंद्रांवर गेले होते. खाजगी केंद्रांवर ही लस उपलब्ध नसल्यामुळे अखेर महापालिकेच्या केंद्रांवर यावे लागले. आता मात्र महापालिकेच्या केंद्रांवरही मोजकाच साठा उपलब्ध असल्याने नागरिक यांचा संयम सुटू लागला आहे. मुंबईच्या बीकेसी केंद्रावर ५००० तर गोरेगााव केंद्रावर ४२०० डोस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मात्र या केंद्रावर यापेक्षा दुप्पट गर्दी दिसून येत आहेत. गेले काही दिवस महापालिकेल येणारा साठा कमी जास्त प्रमाणात आहे.




