अनिल देशमुखांची सीबीआयकडून तब्बल ९ तास चौकशी

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रूपयांच्या आरोपांबाबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागा (CBI) मार्फत बुधवारी सलग ९ तास चौकशी झाली. मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयच्या टीमसमोर सकाळी ११ वाजता अनिल देशमुख हजर झाले होते. सीबीआयच्या टीमने अनिल देशमुख यांचा जबाब दिवसभराच्या प्रश्नोत्तरामध्ये नोंदवून घेतला. दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर सायंकाळी ६ वाजता देशमुख या कार्यालयातून बाहेर पडले. अनिल देशमुख यांना सीबीआयमार्फत दोन दिवसांपूर्वीच समन्स देण्यात आले होते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या लेटर बॉम्बमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला होता. तसेच सचिन वाझे या एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याच्या पोलिस दलातील पुनर्नियुक्तीसाठीही दोन कोटी रूपये मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता. या प्रकरणाची चौकशी ही सीबीआयकडून व्हावी अशी मागणी अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या याचिकेत केली होती. त्यानुसारच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. देशमुख यांच्यावर झालेले कोट्यवधी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप पाहता, या संपूर्ण प्रकरणात देशमुख यांना पुन्हा चौकशीसाठी सीबीआयकडून बोलावण्याची शक्यता आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात सीबीआयकडून माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही चौकशी होऊ शकते.
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानुसार एपीआय सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना बार आणि रेस्टॉरंटकडून महिन्याला १०० कोटी रूपयांचे टार्गेट देण्यात आले होते असा आरोप केला होता. तर सीबीआयने याआधीच सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) कोर्टाकडे परवानगी मागितली होती. या परवानगीसाठी एनआयएच्या टीमसोबत ठरवून चौकशी करा असे कोर्टाने स्पष्ट केले होते. त्यामुळेच नजीकच्या काळात सचिन वाझे यांनाही चौकशीसाठी सीबीआयकडून बोलावण्यात येईल असे कळते.
चौकशीदरम्यान अनिल देशमुखांनी बहुतांश आरोप फेटाळले. त्यांच्यावर झालेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चूकीचे असल्याचा देशमुखांचा दावा आहे. महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिका-यांचा हा प्रयत्न आहे असेही देशमुख म्हणाले. देशमुखांनी अनेक प्रश्नांना “मला माहीत नाही, माझा काहीही संबंध नाही. परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी पत्र लिहून आरोप केल्याचं’, यावेळी सांगितले.




