गोव्यात भाजपला मोठा धक्का; गोवा फॉरवर्ड पार्टीचा ‘एनडीए’ला ‘राम राम’
मुख्यमंत्री प्रमोद सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप

पणजी : गोव्यातील भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने ‘एनडीए’ची साथ सोडली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि ‘एनडीए’चे अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून ही घोषणा केली आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोवा भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
गोवा फॉवर्ड पक्षाने २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधी भूमिका घेत निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर त्यांच्या ३ आमदारांना पर्रिकरांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं होतं. पण पर्रिकरांच्या निधनानंतर या तिन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली.
भाजप आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांच्यात काही दिवसांपासून तणाव असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं होतं. गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी भाजपच्या सरकारवर अनेक आरोपही केले होते. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातील गोवा सरकारचे अनेक निर्णय हे अँन्टी गोवा धोरणाला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे. हा प्रकार म्हणजे गोव्याच्या जनतेबरोबर केलेला अविश्वास आहे. सरकार फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही विजय सरदेसाई यांनी लावला आहे. सरदेसाई यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात अडकलेलं असून जराही प्रामाणिकपणा शिल्लक नसल्याचं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.
जुलै 2019 पासून राज्यातील नेतृत्वानं गोव्यातील जनतेकडं पाठ फिरवली आहे. लोकांना सर्वंकष विकासाची अपेक्षा होती पण की अपेक्षा फोल ठरली. पर्रिकर यांच्या दुर्दैवी निधनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनले आणि राज्यात भ्रष्टाचाराचा खेळ सुरू झाल्याचा आरोप सरदेसाई यांनी पत्रातून केला आहे. सामान्य गोवेकरांचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. गोव्यातील अनोखी जीवनशैली, येथील समृद्ध वारसा, पर्यावरण आणि जीवनमान यालाच धोका निर्माण झाल्याचंही सरदेसाई यांनी म्हटलं आहे.




