
ठाणे (प्रतिनिधी) : खा. संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या कथित धमकीच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख व ॲड. रोहिदास बामा मुंडे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार संजय दिना पाटील यांनी कथितरित्या अत्यंत गंभीर स्वरूपाची धमकीची विधाने केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित वक्तव्यांमुळे नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, संबंधित वक्तव्यात करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, आवश्यक असल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित ठिकाणांची झडती घेण्यात यावी आणि तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार लागू असलेल्या कायद्यांप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू तरतुदींनुसार तात्काळ एफआयआर नोंदवून चौकशी सुरू करावी. तपासादरम्यान इतर कोणत्याही गंभीर किंवा विशेष कायद्यांचा भंग झाल्याचे पुरावे आढळल्यास त्या अनुषंगानेही आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ॲड. रोहिदास बामा मुंडे व सचिन पाटील यांनी केली आहे. निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे. दिवा शहर प्रमुख सचिन पाटील. प्रियंका सावंत. शहर समन्वयक नितीन सावंत. उपविभाग शाखाप्रमुख शशिकांत कुंभारगन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




