Top Newsराजकारण

पावसाळ्यापूर्वीच्या कामांना आचारसंहितेतून सूट द्या!

खा. नरेश म्हस्के यांची मागणी

ठाणे – राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे रखडली असून, या कामांना आचारसंहितेतून विशेष सूट देण्यात यावी, अशी मागणी खा. नरेश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

राज्यात २५ जूनपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची ‌अनेक विकासकामे आणि निविदा प्रक्रिया प्रलंबित राहिल्या आहेत. विशेषतः आगामी पावसाळ्याच्या ‌पार्श्वभूमीवर नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा व्यवस्था, ड्रेनेज दुरुस्ती, संरक्षक भिंती, सांडपाणी व्यवस्थापन तसेच आपत्कालीन प्रतिबंधात्मक कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे म्हस्के यांनी निवेदनात नमूद केले आहे.

आचारसंहितेमुळे संबंधित कामांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रिया राबविणे आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात करणे शक्य होत नसल्याने नागरिकांना आगामी पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीतीही म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक हिताचा विचार करून पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक व आपत्कालीन स्वरूपाची कामे करण्यास विशेष ‍परवानगी द्यावी, तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांना निविदा प्रक्रिया व कामे सुरू करण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी खा. म्हस्के यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button