
मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत अजूनही खटके उडत आहेत. भाजप आणि शिवसेनेचे नेते सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. यामुळेच काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, २०२४ मध्ये निवडणूक होईल, त्यात दिल्लीतील चित्रं बदलून जाईल. भाजपने आता महाराष्ट्रालाही विसरुन जावं. त्यांचे ७५-१०० उमेदवार जिंकतीलही, पण, भविष्यात महाविकास आघाडी सत्तेत असेल. पुढचे २५-३० वर्षे तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहील की नाही माहीत नाही, असा टोला राऊतांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, आमच्या तिन्ही पक्षांनी जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी एक पत्रक जारी केले आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन ही भूमिका घेतली आहे. स्थानिक राजकारणाच्या नावाखाली अनेकदा भ्रष्ट हात मिळवण्यात पुढे होत असतात. युतीत असतानाही आमच्या काही लोकांनी चुका केल्या होत्या. अशा प्रकारची मनमानी आता चालणार नाही. शिवसेनेकडून असं काही होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत, असंही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, पण तिकडे भाजप अडचणीत असल्यामुळे आयोग आमच्या तक्रारीची दखल घेत नाही. पुरावे समोर ठेवूनही आयोग सुनावणी घ्यायला तयार नाही. ही मनमानी आणि हुकूमशाही आहे. निवडणूक आयोग गुलाम झाल्याचे लक्षण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
राज्यात काय देशातही भाजप सत्तेत येणार नाही; पटोलेंचे समर्थन
राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आता काही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा केला होता. याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समर्थन दिले असून, राज्यात सोडा, देशातही भाजपची सत्ता येणार नसल्याचा दावा केला आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यातील जनतेला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. आम्ही जनतेच्या कौलचा आदर केला आहे. आम्ही स्वतंत्र लढलो होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना जर त्या पद्धतीने सूचना केल्या तर स्थानिक कार्यकर्ते एकत्र बसून निर्णय घेतील, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नगराध्यक्ष निवडणुकीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपने कितीही दिवास्वप्न पाहिले तरी ते पूर्ण होणार नाही. भाजपला रोखण्यासाठीच महाविकास आघाडी तयार करण्यात आली होती. आता नगरपंचायत निवडणुका झाल्या. ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचा नगराध्यक्ष बसवायचा असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.




