राज्यात ५ महिन्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई : राज्यात अवघ्या ५ महिन्यात १०७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आज शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी विधानसभेत सादर करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर महिन्यातील ही आत्महत्यांची प्रकरणाची माहिती समोर आली आहे.
यावर्षी जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत १०७६ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. ४९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे ही जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवली. तर २१३ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली असून ३७२ आत्महत्यांची पडताळणी व्हायची आहे. त्यात ४९१ पैकी ४८१ जणांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा पीकविमा, सानुग्रह अनुदान, महिलांवरील अत्याचार यांसह विविध मुद्द्यांवरुन विधानसभेत गदारोळ पाहायला मिळत आहे. त्यातच, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्यासंदर्भात दिलेली ही माहिती धक्कादायक आहे.
राज्यात सरकार कोणाचंही असून बळीराजाने आपले जीवन संपवल्याच्या दुर्दैवी घटना वारंवार घडतच आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी सावकाराचं कर्ज यांसारख्या अनेक समस्यांना घेऊन बळीराजा अखेर फाशीचा दोर जवळ केल्याचं धक्कादायक आणि लाजीरवाणं चित्र महराष्ट्रात दिसत आहे.
विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत माहिती देताना, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४९१ शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावरील समित्यांकडून राज्य सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभही देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना योजनेंतर्गत आर्थिक मदत पोहचविण्यात आल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मूळ कारण कर्जाचं ओझं आणि ते चुकीविण्यास ते समर्थ नसणे हेच आहे. नैसर्गिंक संकटे आणि नापिकीकरण यामुळे शेतकरी अडचण येत असून कर्ज फेडू शकत नाही. त्यासोबतच, कौटुंबिक आणि खासगी आर्थित अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल येथील शेतकऱ्यांना उचलावं लागल्याचंही वडेट्टीवार यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितलं.




