
आपण व्यक्ती म्हणून पक्षपाती असतो
समाज म्हणून दांभिक असतो
राज्यकर्ते म्हणून निष्क्रिय आणि गेंड्याच्या कातडीचे असतो
विरोधक म्हणून संधिसाधू असतो
राजकीय नेते म्हणून कातडीबचाऊ असतो
प्रत्येक गोष्टीकडे आपल्याच चष्म्यातून पाहत असतो. आणि न्यायाधीश बनून निकाल देत असतो. गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकच्या साहित्य संमेलनात शाईफेक झाल्यानंतर हे पुन्हा एकदा समोर आले आहे. सर्वप्रथम मी कुबेर यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. अशा प्रकारच्या हल्ल्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. हल्लेखोरांवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. मात्र या एकूण विषयाकडं पाहिल्यानंतर जबाबदार घटकांचा बेजबाबदारपणा समोर येतो. तो आपल्या समाज म्हणून असलेल्या एकूण बेजबाबदार वर्तनाशी सुसंगत आहे.
गिरीश कुबेर यांचे ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले मे २०२१ मध्ये. सहा महिने उलटून गेलेले आहेत. या सहा महिन्यात या पुस्तकासंदर्भात विविध घटकांनी आक्षेप नोंदवले आहेत. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह अनेक सामाजिक संघटनांनी आक्षेप नोंदवले आहेत. पुस्तकातील आक्षेपार्ह भाग वगळावा, पुस्तकावर बंदी घालावी आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कुबेर यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या.
छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांना ठार केले, हा पुस्तकातला आक्षेपार्ह मजकूर आहे. छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती, असेही संबंधित पुस्तकात म्हटले आहे. लेखकाचे ते मत आहे आणि त्यांना ते व्यक्त करण्याचा अधिकार असल्यामुळे त्यासंदर्भात आक्षेप घेणे मला इष्ट वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांशी बाजीराव पेशव्यांची केलेली तुलनाही लेखकाच्या आकलनाचा आणि मनोवृतीचा भाग म्हणून दुर्लक्षित करता येऊ शकते. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी सावत्र आई सोयरबाईंना ठार केले अशी धादांत खोटी मांडणी कुबेरांनी पुस्तकात केली आहे. चिटणीसाची बखर किंवा अशाच काही बखरकारांनी केलेल्या बदनामीकारक लिखाणाचा आधार घेऊन कुबेरांनी ही मांडणी केली आहे, आणि त्यांचे म्हणणे असे की, आपण पुराव्यांच्या आधारे लिहिले आहे.
संभाजी महाराजांचा हा इतिहास खोटा असल्याचे वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या संशोधकांनी दीर्घकाळ संशोधन करून सिद्ध केले आहे. नंतरच्या काळातील अनेक इतिहासकारांनी त्याला पुष्टी दिली आहे. असे असूनही समाजमाध्यमांतून या विषयावर बाजू घेऊन आणि भाबडेपणाने म्हणजे सोयीस्कर पद्धतीने चर्चा होताना दिसतेय. तथाकथित बुद्धिवंतांचा त्यात अधिक भरणा आहे. या बुद्धिवंतांचा डोळ्यावरची झापडे दूर होण्याची अपेक्षा आहे.
कोणत्याही जबाबदार लेखकाने अद्ययावत संदर्भ वापरणे अपेक्षित असते. ते इथे केले गेलेले नाही. संवेदनशील विषयांबाबत अधिक जबाबदारीने लेखन करणे आवश्यक असते, त्या जबाबदारीचे भानही इथे दिसत नाही. खोट्या पुराव्यांच्या आधारे बदनामीकारक लिहिणे, चारित्र्यहनन करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
जेम्स लेन प्रकरणातही असेच घडले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उमाळे अनेकांना फुटले होते.
केवळ पुण्यातल्या कंपूच्या कुजबूजीच्या आधारे एका स्त्रीच्या (जिजाऊंच्या) चारित्र्यावर शिंतोडे उडवणे कुठल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसते? ही गोष्ट आपल्यासंदर्भात घडली तर आपण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करणार का? हे प्रश्न उपस्थित करता येतात. यासंदर्भात तक्रारी झाल्या तेव्हा कुबेरांनी त्या बेदखल केल्या आणि सरकारने कारवाईचे कोणतेही पाऊल उचलले नाही, त्यामुळे आजची घटना घडली. ती घडायला नको होती, परंतु कुबेर आणि सरकार दोहोंच्या निष्क्रियतेमुळे ती टाळता येण्यासारखीही नव्हती.
जेव्हा कुबेरांचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा अनेकांनी संशोधनाचे अद्ययावत दाखले देऊन चूक निदर्शनास आणून दिली होती. कुबेरानी खोट्या पुराव्यांच्या आधारे बदनामीकारक लिहिले असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. परंतु कुबेर यांनी सर्वांना बेदखल केले आणि आपण लिहिले आहे तेच अंतिम सत्य असल्याच्या थाटात वावरत राहिले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत अशा अनेक जबाबदार घटकांनी निषेध नोंदवून सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु सरकार ढिम्म राहिले.
संभाजी ब्रिगेडचा मार्ग चुकीचाच आहे, परंतु अशा चुका झाल्याशिवाय खोट्या गोष्टी दुरुस्त होत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. चूक निदर्शनास आणल्यानंतर ती दुरुस्त करण्याचा मोठेपणा कुबेरांनी दाखवला नाही. सरकारनेही दखल घेतली नाही. त्यामुळे प्रकरण या थरापर्यंत गेले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य चारित्र्य हननाला परवानगी देत नाही, हे सुज्ञांनी लक्षात घ्यायला हवे. चुकीचे इंटरप्रिटेशन मान्य, परंतु फॅक्ट चुकीच्या मांडून माझेच खरे म्हणणे कसे मान्य होईल ? इथे कुबेरांनी फॅक्ट चुकीची मांडली आहे आणि ती संभाजीराजांचे चारित्र्यहनन करणारी आहे. या मुद्द्यांसंदर्भात संबंधित मंडळी सनदशीर संघर्ष करीत होती. एक दोन नव्हे, तर तब्बल सहा महिने संघर्ष करीत होती, तेव्हा आज गळे काढणाऱ्या किती जणांनी तोंड उघडले होते किंवा भूमिका घेतली होती?
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चिखलफेक करून कुणाला पळून जाता येणार नाही. किंवा धुरळा खाली बसला म्हणजे विषय संपला असे म्हणून निवांत होता येणार नाही. हा विषय संपला आहे असे मला वाटत नाही, तो आता कुठे सुरू झाला आहे. विचारांचे उत्तर विचारांनी देता येते, पण चारित्र्यहनन असेल तर ते पुसावेच लागेल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अजूनही शहाणे व्हावे. संबंधित पुस्तकातील वादग्रस्त मजकुराबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. कोणताही हल्ला निषेधार्हच. मी हल्ल्याचा निषेधच करतो, पण घटना या थराला जाण्यास लेखक आणि सरकार दोन्ही जबाबदार आहेत.




