Top Newsस्पोर्ट्स

वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार; विराट कोहलीची घोषणा

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले. मागील काही दिवसांपासून विराट आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडेल अशी चर्चा होती. रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती, परंतु बीसीसीआयनं हे वृत्त खोडून काढले होते. मात्र गुरुवारी विराटनं यावर मौन सोडलं. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आपण फक्त वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळणार असल्याचे त्यानं जाहीर केलं अन् बीसीसीआयला तोंडावर पाडलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटीत ६५ सामन्यांत सर्वाधिक ३८ विजय मिळवले आहेत, तर १६ सामन्यांत पराभव व ११ सामने अनिर्णीत राहिले आहेत. वन डेत ९५ सामन्यांत ६५ विजय व २७ पराभव, तर ट्वेंटी-२०त ४५ सामन्यांत २७ विजय व १४ पराभव झाले आहेत.

https://twitter.com/imVkohli/status/1438478585518456832

भारतीय संघाचे फक्त प्रतिनिधित्वच नव्हे तर नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. या प्रवासात मला पांठिबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. सहकारी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. कामाचा ताण हा महत्त्वाचा भाग आहे आणि मागील ८-९ वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन. ट्वेंटी-२०त मी टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि पुढेही फलंदाज म्हणून योगदान देत राहीन. रवी भाई, रोहित आणि जवळच्या प्रत्येक व्यक्तीशी मी चर्चा केली. त्यानंतरच मी हा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर मी कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. याबाबत मी सचिव जय शाह व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही चर्चा केली, असं विराटनं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button