
सावंतवाडी : संजय राऊत यांनी अग्रलेख लिहिला, आता मी उद्यापासून प्रहारमधून लिहिणार, असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिला. तसेच, माझ्या घरावर आले, माझ्या मुलापर्यंत आले, मी विसरणार नाही. माझा त्यांना इशारा आहे, माझ्यातील नारायण राणे जागा करू नका, असं म्हणत नारायण राणेंनी संजय राऊत आणि शिवसेनेलाही थेट इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. सायंकाळी त्यांना जामीन मंजुर झाला, पण या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. दरम्यान, या घटनेमुळे राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत खंड पडला होता. पण, त्यांनी दोन दिवसांपूर्वी आपली यात्रा सुरू केली आणि आज या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. जन आशीर्वाद यात्रेचं कोकण दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ढोलताश्यांच्या गजरात प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. आपल्या खात्याची माहिती देत येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप कोकणमय करू असा विश्वास दर्शवला.
राणे पुढे म्हणाले की, माझ्या जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेल्यासारखं काही अपशकुन झाले. त्यानंतर आता अग्रलेख येत आहेत. कोणाच्या मुलांवर बोलण्यापेक्षा आपली मुले किती पराक्रमी आहेत, हे त्यांनी पहावं. संजय राऊत तुमच्या मालकाची मुलं काय करत आहेत ते आधी पाहा. राऊतांमुळे शिवसेना वाढत नाहीये. ‘सामना’ची प्रतिमा बौद्धिक वर्गात चांगली नाही, असा घणाघातही राणेंनी केला.
अजित पवार अज्ञानी
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार? असा सवाल करत अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना राणेंनी अजित पवार अज्ञानी असल्याचा घणाघात केला आहे. अजित पवार अज्ञानी असून त्यांनी त्यांच्या खात्याकडे लक्ष द्यावं, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, असं राणे म्हणाले.
अजित पवार अज्ञानी आहेत. त्यांना केंद्रातलं काही कळत नाही. त्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावं. ते फक्त आपल्यामागे लागलेल्या चौकशा आणि आरोप टाळण्यात हुशार आहेत, असं राणे म्हणाले.
संदुक कसली उघडताय? रोखठोक काय ते बोला
तुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना सामनाचा संपादक, ना धड प्रवक्ता. त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय, असं राणे म्हणाले.




