दानिश सिद्दीकी यांच्या हत्येचा जगभरातून निषेध

नवी दिल्ली :पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळविलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी अफगाणिस्तानातील संघर्षाचे वार्तांकन करत असताना त्यांची तालिबानींनी हत्या केली. दानिश यांचा मृतदेह तालिबानींनी रेड क्रॉसच्या हवाली केला असून तो लवकरच भारतात आणण्यात येईल. दानिश यांच्या हत्येचा जगभरात निषेध होत असून देशात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
दानिश यांच्या हत्येची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क तसेच प्रसारमाध्यमांशी संबंधित संघटनांनी केली आहे. तालिबानींनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात दानिश सिद्दिकी गंभीर जखमी झाले होते. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. अमेरिकेतील कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स या संघटनेने म्हटले आहे की, दानिश यांच्या हत्येची अफगाणिस्तान सरकारने चौकशी करावी. व्हिएन्ना येथील इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट या संस्थेने सांगितले की, दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूमुळे पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये यंदाच्या वर्षी हत्या झालेले दानिश सिद्दिकी हे पाचवे पत्रकार आहेत.
‘तो’ भाग तालिबानकडून परत मिळाल्याचा अफगाणिस्तानचा दावा
पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानातील कंदाहारमध्ये सुरु असलेल्या अफगाणिस्तान-तालिबान संघर्षामध्ये मृत्यू झाला. यामुळे जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ज्या भागात दानिश सिद्दीकींचा मृत्यू झाला तो भाग पत मिळविल्याचा दावा अफगाणिस्तान लष्कराने केला आहे.
दानिश सिद्दीकी हे अफगाण स्पेशल फोर्ससमवेत सोबत होते आणि तेथील तालिबानविरूद्ध त्यांच्या कारवायांचे वृत्तांकन करत होते. माध्यमांमध्ये वृत्त झळकताच या घटनेचा निषेध व्यक्त झाल्यानंतर तालिबानने यावर स्पष्टीकरण दिले होते. तसेच खेदही व्यक्त केला होता.
अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहीमेचे वृत्तांकन करत असताना गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. दानिश सिद्दीकी हे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेचे दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार पदावर कार्यरत होते. भारतात कोरोना या महारोगाची साथ पसरली असताना त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून कोरोना संकटाची दाहकता जगासमोर आली होती.




