राजकारण

उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात सामील होण्यास ‘आप’चा नकार

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भाजपविरोधी पक्षांनी आघाडी करण्यास सुरुवात केली असून, काही पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. यातच आता भाजपला विरोध म्हणून स्थापन करण्यात आलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या आघाडीमध्ये सहभागी होण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे.

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर आणि एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रितपणे भागीदारी संकल्प मोर्चा स्थापन केला असून, आम आदमी पक्षाने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओम प्रकाश राजभर आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर आता आप नेते संजय सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रकाश राजभर आणि आप नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात कोणतीही बैठक झालेली नाही. आप पक्ष भागीदारी संकल्प मोर्चात सहभागी होणार असल्याचे वृत्त, चर्चा खोट्या आणि आधारहीन आहेत. राजभर चुकीची वक्तव्ये करत आहेत. केजरीवाल यांनी राजभर यांची भेट घेतलेली नसून, कोणत्याही मोर्चा, आघाडीत आप आताच्या घडीला तरी सहभागी होत नाही, असे आप नेते संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी बोलताना, भाजप हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भाजपला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. मात्र, जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा केली जाते, तेव्हा बाहेरून माणसे आणली जातात. केवळ मतांसाठी भाजप मागासवर्ग समाजाला जवळ करते, असा दावा राजभर यांनी केला आहे.

दरम्यान, एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष शौकत अली यांनी भागीदारी संकल्प मोर्चात ८ पक्षांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या मोर्चाचे संयोजक राजभर उत्तर प्रदेशात मजबूत गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला या निवडणुकीत पराभूत करणे हेच या मोर्चाचे ध्येय असल्याचे अली यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button