राजकारण

पुण्यात राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात भाजप नेत्यांचा पाहुणचार

पुणे : भाजपाच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाला दिलेली भेट ही केवळ औपचारिक होती का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी-भाजपा असा सत्तेचा ‘पुणे पॅटर्न’ राज्याने अनुभवलेला असल्याने ही निव्वळ सदिच्छा भेट होती की भविष्यातील ‘पुणे पॅटर्न’ची रंगीत तालीम होती अशी चर्चाही रंगू लागली आहे.

पुण्यातील राजकीय घडामोडी आणि सत्ता समीकरणांची देश पातळीवर नेहमीच चर्चा होत असते. राजकीय मतभेद असले तरी एकमेकांप्रती सद्भाव आणि मैत्री जपणारे शहर म्हणून पुण्याची ख्याती आहे. त्याचाच प्रत्यय पुणेकरांना पुन्हा आला. राष्ट्रवादीच्या नूतन शहर कार्यालयाला भाजपाच्या खासदार, शहराध्यक्ष, महापौर यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांसह भेट देत राष्ट्रवादीचा पाहुणचार घेतला. यावेळी हलक्या-फुलक्या वातावरणात राजकीय गप्पाही रंगल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन कार्यालय महापालिकेजवळ आणण्यात आले आहे. या कार्यालयाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित लवकर यांच्या हस्ते नुकतेच झाले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच भेट दिली आहे. या कार्यालयाला भेट देण्याचे निमंत्रण राष्ट्रवादीकडून भाजपाला देण्यात आले होते. त्याचा स्वीकार करून खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच शहर पदाधिकारी यांनी कार्यालयाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालिकेच्या निवडणुका आगामी फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणूका जवळ आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. दोन्ही बाजुंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपाकडून राज्य सरकार आणि मंत्री ‘टार्गेट’ केले जात आहेत. तर, राष्ट्रवादीने पालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपाला ‘शह’ देण्यास सुरुवात केली आहे.

अशा राजकीय गदारोळात भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात हलक्याफुलक्या गप्पा झाल्या. यासोबतच एकमेकांना कोपराखळ्याही मारण्यात आल्या. शुक्रवारी झालेल्या या भेटीमुळे पुण्यातील या राजकीय मैत्रीची चर्चा रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button