राजकारण

भाजपात जाणं मोठी चूक; मुंडण आणि शुद्धीकरण करून २०० कार्यकर्त्यांची तृणमूलमध्ये ‘घरवापसी’

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसला रामराम करून अनेक नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी ममता बँनर्जींना जोरदार धक्का दिला होता. मात्र त्यानंतर आता काही कार्यकर्ते बॅकफूटवर आलेले पाहायला मिळत आहेत. भाजपाचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरुन जनतेची माफी मागत आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर बंगालचं राजकारण ढवळून निघालं. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आहे. याच दरम्यान हुगळी जिल्ह्यात जवळपास २०० कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घटना घडली आहे.

कार्यकर्त्यांनी गंगाजलने आपलं शुद्धीकरण करुन घेतलं. भाजपामध्ये प्रवेश करणं आपली खूप मोठी चूक होती असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तसेच त्यांना आपल्या या चुकीसाठी मुंडण करुन घेत आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुगळी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचा झेंडा हाती घेतला आणि स्थानिक खासदारांना पाठिंबा दर्शवला आहे. तृणमूलचे खासदार अपरुपा पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी त्यांनी आरामबाग येथे गरीबांना मोफत अन्न पुरवण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

कार्यक्रमासाठी काही लोक आले आणि आपण भाजपामध्ये जाऊन खूप मोठी चूक केली असल्याचं म्हटलं. आपल्या चुकीचं प्रायश्चित्त केल्यानंतर ते पुन्हा तृणमूल मध्ये येऊ इच्छित होते. विधानसभा निवडणुकीत तृणमूलला मिळालेल्या यशानंतर अनेक जिल्ह्यांमधील कार्यकर्ते पुन्हा एकदा तृणमूलमध्ये येत आहेत. याआधी बीरभूम येथे 50 हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत आपल्याला पुन्हा पक्षात घ्यावं अशी मागणी केली होती. यानंतर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला होता. यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल खेद व्यक्त केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button