राजकारण

सरनाईक हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न : फडणवीस; सेनेसोबत जाण्यास भाजप अनुत्सुक !

मुंबई : रविवारी दिवसभर चर्चेत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर अखेर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले की, भाजपासोबत युती करावी ही प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणे अनेकांची इच्छा आहे. परंतु हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. सध्यातरी आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न मांडत आहोत. विधानसभा निकालात आम्ही सर्वाधिक जागा जिंकल्या परंतु बहुमत नव्हतं. मात्र आगामी काळात आम्ही बहुमतानं निवडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच भाजपा स्वबळावरच लढत आहे. त्यामुळे कुणी जोडे मारावे आणि कुणाला हार घालावे हे त्यांनी ठरवावं. आमची बांधिलकी जनतेशी आहे असंही फडणवीसांनी स्पष्ट केले.

घोटाळ्याच्या प्रकरणावरून कित्येक दिवस माध्यमांपासून दूर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या एका पत्रानं राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपासोबत आघाडी करावी अशी मागणी केली आहे. इतकचं नाही तर प्रताप सरनाईक यांनी पत्रातून काँग्रेस-राष्ट्रवादीवरही गंभीर आरोप लावले आहेत. महाविकास आघाडीत शिवसेनेला कमकुवत करण्याचं काम केले जातंय असं त्यांनी म्हटलं होतं.

शिवसेनेकडून जुळवून घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजप वेट अँड वॉच या भूमिकेत असेल असं बोललं जात होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावरच भाजप बहुमताने सत्तेत येईल, असं म्हटल्याने शिवसेनेसोबत युती करण्यास भाजप अनुकूल नाही की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button