राजकारण

इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा पुन्हा मोदींना सणसणीत टोला

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ‘मोदी सरकारच्या विकासाची अशी परिस्थिती आहे की, जर एखाद्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत तर ती जास्त मोठी बातमी होते’ असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याआधीही त्यांनी मोदी सरकारवर यावरून सातत्याने टीका केली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण सांगितलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना, मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या एमएसपीची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत, असं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button