मुंबई : शिवसेना नेते आणि खा. संजय राऊत यांनी काळ पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. आज सकाळी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे दुपारी ४ वाजता भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळं राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.
झुकला तेव्हाच मुख्यमंत्री झाला : रावसाहेब दानवे
आम्ही पाडायला आलो, आम्ही पाडायला आलो असा जो कांगावा सुरु आहे, परंतू कोणीही त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत नाहीय. भाजपचे साडेतीन नेते कोण, हे जनतेला ऐकायचे होते. जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा लहानपणी फुसका फटाका वाजवायचो तशी त्यांची पत्रकार परिषद झाली. मुंबईत कार्यकर्ते असताना नाशिक आणि पुण्यातून माणसे बोलवावी लागलीत, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला.
जे आरोप केलेत ते निराधार आहेत. किरीट सोमय्या असतील किंवा अन्य कोणी सिद्ध करा, आम्ही तयार आहोत. तुम्ही घोटाळ्यांची चौकशी करावी, राज्य सरकार तुमच्या हातात आहे. कागदे दाखविली का? हातात घेऊन बसले. या कहानीचा शेवट आम्ही करू, असा इशारा रावसाहेब दानवे यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कार्यकर्त्यांची कमतरता आहे का? तुम्ही जे आरोप करता ते सिद्ध करावेत. युतीमध्ये फूट पाडण्यास आम्ही रिकामे नाही. हे अमर अकबर अँथनीचे सरकार आहे. ते कधी एकमेकांच्या पायात पाय घालून पडतील कळणार नाही. ज्यांच्यासोबत गेला त्यांच्यासोबत सुखाने रहा. अमित शहा यांना फोन करायला त्यांनी माणसे पाठवली का? झुकले तेव्हाच मुख्यमंत्री झाल्याची टीका दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. झुकले वाकले आता पुढची वेळ येईल अशी टीकाही दानवे यांनी केली. ईडी ईडीचे काम करतेय आम्ही कशाला सांगू त्यांना यांच्याकडे त्यांच्याकडे जा. जमिन कितीही घ्या त्याची ईडी चौकशी करेल ना. तुम्ही घोटाळा करून राज्यावर बसलात त्याचे काय? असा सवाल त्यांनी केला.
‘राऊतांनी बोलताना तारतम्य ठेवावं : महाजन
भाजप नेते या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवरुन शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. या पत्रकार परिषदेतून आरोपांशिवाय काहीच साध्य झालं नसल्याचं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलंय. संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चुहा. पण, इथं तर चुहा पण निघाला नाही’, असे म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टीका केली. शिवसेनेची इतकी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती. संजय राऊत यांनी आरोप करतांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे व पुरावे सादर केले नाहीत. नुसतेच आरोप केलेत, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला, इतकं कमिशन खाल्ल गेलं, याला काहीही अर्थ नाही
संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत, पण त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बेछूट आरोप केलेत, त्यांनी बोलतांना तारतम्य ठेवायला हवं. केंद्रीय तपास यंत्रणांवर त्यांनी आक्षेप घेण चुकीचं, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर सादर करावेत. आजच्या पत्रकार परिषदेचा गाजावाजा किती केला, पण ती खोदा पहाड निकला चुहा अशीच राहिली, इथं तर चुहा पण निघाला नाही. त्यामुळं आता त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
अमित शाह तर प्रचारात व्यस्त होते; संजय राऊतांचा दावा भाजपने खोडून काढला
आपण खूप महत्त्वाचे आहोत असे संजय राऊत यांना उगाचच वाटते म्हणून आपली पत्रकार परिषद गृहमंत्री @AmitShah बघत असतील असा गैरसमज त्यांनी व्यक्त केला. प्रत्यक्षात ते उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात बिझी होते. किती किती गैरसमज आहेत राऊत स्वतः बद्दल.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2022
संजय राऊत तुमच्याकडे कागद असते तर तुम्हाला शिव्या घालण्याची गरज पडली नसती. पत्रकारांना तुमची जीभ का घसरते? असा प्रश्न विचारावासा वाटत नाही इतकी तुमची दहशत आहे, पण तुमचे फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसते आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2022
भाजपा आमदारांची आणि भाजपा नेत्यांची चौकशी केली तर आम्ही तुमच्या सारखे आकांडतांडव करणार नाही, उगाचच हा महाराष्ट्राचा अपमान असा पोरकट बचाव ही करणार नाही. तर्क मांडू, चौकशीला सामोरे जाऊ. कर नाही त्याला डर कशाला????
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2022
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर ट्विटरद्वारे म्हणाले की, आपण खूप महत्त्वाचे आहोत, असे संजय राऊत यांना उगाचच वाटते म्हणून आपली पत्रकार परिषद गृहमंत्री अमित शाह बघत असतील, असा गैरसमज त्यांनी व्यक्त केला. प्रत्यक्षात ते उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, असं म्हणत स्वतः बद्दल किती गैरसमज आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे.