Top Newsराजकारण

योगी आदित्यनाथांचे टेन्शन वाढले; अखिलेश आणि काका शिवपाल यादवांचे मनोमिलन

लखनऊ: राजकारणात खूप काही शक्य आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे राजकारणी कधी एक होतील आणि एकमेकांवाचून न राहणारे कधी वेगळे होतील हे कोणीही सांगू शकत नाही. उत्तर प्रदेशमध्येही असाच प्रकार घडला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगळे झाल्याने सत्ता गेलेले सपाचे अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांनी या निवडणुकीत हात मिळवणी केली आहे. यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांनी आज भेट घेतली. यानंतर अखिलेश यांनी या युतीची घोषणा केली आहे. प्रसपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल यांच्याशी चर्चेत उत्तर प्रदेशमध्ये युती करण्याचे निश्चित झाले आहे. स्थानिक पक्षांना एकत्र आणण्याची नीति सपाला सतत मजबूत करत आहे. यामुळे ऐतिहासिक विजयाकडे जात आहोत, असे अखिलेश म्हणाले.

शिवपाल यादव हे मुलायमसिंह यादवांचे भाऊ आहेत. २०१७ मध्ये अखिलेश आणि शिवपाल यांच्यात तणाव वाढला होता. शिवपाल यांचे सपामध्ये मोठे प्रस्थ होते. त्यांनी सपा सोडून दुसरा पक्ष स्थापन केल्याचा फटका अखिलेश यांना बसला होता. आता पुढील वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवपाल यांनी काही दिवसांपूर्वी प्रसपा ही सपामध्ये विलिनीकरण करण्याचे संकेत दिले होते. यावर अखिलेश यांनी तुम्ही माझे काका आहात, तुमचा सन्मान ठेवला जाईल असे उत्तर दिले होते. या दोघांच्या एकत्र येण्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button