येडियुराप्पा मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार, पण…? भाजप नेतृत्वासमोर मोठा पेच
नवी दिल्ली : उत्तराखंडचा मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता कर्नाटकातही मोठा बदल करण्याची भाजपाने तयारी केली आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांची खुर्ची धोक्यात आली असून गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बंडाळीमुळे भाजपाने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला आहे. काँग्रेस-निजदला सत्तेवरून खाली खेचत येडियुराप्पा यांनी भाजपाची सत्ता स्थापन केली होती. परंतू त्यांची एकाधिकारशाही भाजपाच्या अन्य नेत्यांना रुचली नसल्याने काही काळातच त्यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त होऊ लागली होती.
भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने येडीयुराप्पांना दिल्लीला पाचारण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्यावर आपल्या खुर्चीला धोका नसल्याचे वक्तव्य येडियुराप्पा यांनी केले आहे. परंतू, भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु झाल्या असून राज्यात लिंगायत समाजाचे वर्चस्व असल्याने त्याच समाजाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
येडियुराप्पा यांनी २०१२ मध्ये भाजपा सोडून नवा पक्ष स्थापन केला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या केजेपी पक्षाला एकूण ९.८ टक्के मते मिळाली होती. तसेच ६ आमदार निवडून आले होते. त्यात येडियुराप्पा, शोभा करंदलाजे हे होते. भाजपलाही मोठी झळ बसली होती. यानंतर येडियुराप्पा यांनी भाजपात प्रवेश करत लोकसभा लढविली होती. लोकसभेला जिंकले व राज्याच्या निवडणुकीवेळी त्यांना पुन्हा राज्यात पाठविण्यात आले होते. जदयू-काँग्रेसचे सरकार पाडल्यानंतर येडीयुराप्पांचा पुत्र बी .एस. विजयेंद्र यांनी सरकारमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. यामुळे भाजपाच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. प्रकरण बंडापर्यंत पोहोचले होते. यामुळे मोठे राज्य हातचे जाऊ नये म्हणून भाजपा मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता आहे.
येडियुराप्पांच्या तीन अटी
यासाठी लिंगायत समाजाच्याच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यासाठी येडियुराप्पा यांनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत.