शिक्षण

मोठी बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थ्यांना दिलासा

बारावीची मे अखेर, तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार

मुंबई : गेल्या महिन्याभरात राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील राज्यात वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या शालांत परीक्षांबाबत गेल्या काही दिवसांमध्ये मोठी चर्चा पाहायला मिळत होती. राज्य सरकारने एमपीएससीची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याबाबत मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली असून दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपासून हेलकावे खात असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे.

करोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अखेरीस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे अखेर तर दहावी परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची यासंदर्भात महत्त्वाची बैठक आज पार पडली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे पुन्हा नव्याने नियोजन करण्यात येणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार या परीक्षा घेण्यात येणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस दहावीच्या तर जूनमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात येईल. यासाठी नव्याने वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, गेल्या दहा दिवसांत करोनाचा राज्यात उद्रेक झाला. करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमालीची वाढली असून, यात पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी असे परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला.

Related Articles

Back to top button