Top Newsराजकारण

देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेश निवडणूक जिंकणार का? काँग्रेसचा मोदींवर निशाणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आधीचा एक दिवस म्हणजेच १४ ऑगस्ट हा ‘फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस’ म्हणून मानला जाणार असल्याची घोषणा केली. भारत-पाकिस्तान फाळणीची घटना ही वेदनादाई होती. तिरस्कार आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बंधू भगिनींना विस्थापित व्हावे लागले होते. ही वेदना कधीही विसरता येणार नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, असं मोदी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या घोषणेनंतर काँग्रेसनं त्यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसनं यावर प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यानंतर विभाजनाची आठवण झाली, असं म्हणत पंतप्रधानांवर निशाणा साधला.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी यावरून टीका केली आहे. “फूट पाडणारी फसवणूक उघड झाली. आता तुम्ही देशाला फसवू शकत नाही. २२ मार्चला पाकिस्तानचं अभिनंदन. आठवा २२ मार्च हा तो दिवस होता जेव्हा मुस्लीम लीगनं (२२ मार्च १९४०) विभाजनाचा प्रस्ताव पारित केला होता. गेल्या १४ ऑगस्ट रोजीही पाकिस्तानचं अभिनंदन. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यानंतर विभाजनाची आठवण झाली. वाह साहेब,” असं म्हणत सुरजेवाला यांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यांनी आपल्या ट्विटसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही ट्विटही शेअर केले आहेत.

‘फाळणी स्मृती दिना’वरून नाना पटोले यांची टीका

स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना पुन्हा हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडण लावून व या देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे का? अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पटोले म्हणाले, १४ ऑगस्ट १९४७ राेजी देशाची फाळणी झाली. त्या दिवशी मोठा रक्तपात झाला. हिंदू-मुस्लिम दंगल झाली. तो स्मृतिदिन पाळण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. अशा दिवसाचाही स्मृतिदिन कुणी पाळेल का? हे मोठे षडयंत्र आहे. आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हे होत नाही ना, अशी शंका येते. भाजपने केवळ ओबीसींचेच आरक्षण संपवले असे नाही तर अनुसूचित जाती-जमातीचेही आरक्षण संपवण्याची तयारी केली असल्याचा इशारा पटोले यांनी कार्यक्रमात बोलताना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button