Top Newsराजकारण

एसटी आंदोलनातील हटवादी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार; परब यांचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर होते. हा संप १५ दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिहासिक ४१ टक्के पगारवाढ जाहीर केली आणि संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं.

एसटी डबघाईला आली आहे, तिला खाईत लोटू नका असंही परिवहन मंत्री म्हणालेत. आम्ही गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्न सदावर्ते या सर्वांशी चर्चा केली आहे, मात्र सदावर्ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी कोर्टात लढावं, आमचं काही म्हणणं नाही असंही परब म्हणालेत. न्यायालयीन प्रक्रियेचा वेळ सदावर्ते कमी करु शकतात का? असा सवालही परबांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी हट्ट न करता कामावर हजर व्हावं असं आवाहन अनिल परबांनी केलंय. त्यामुळे आता परबांच्या आवाहनाला एसटी कर्मचारी किती प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार सांगतो, तुटेपर्यंत ताणू नका, कोणी आपल्याला भडकवत असेल तर त्यांच्या भडकवण्याला आपण बळी पडू नका, कारण नुकसान भडकवणाऱ्याचे होत नाही, नुकसान एसटीचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे होत आहे. हायकोर्टाने आम्हाला १२ आठवड्यांच्या आत निर्णय घ्या असे सांगितले होते, त्यामुळे आम्ही हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करु शकत नाही. मात्र जी टीका होत होती एसटीवर राज्य सरकार काहीच करत नाही, राज्य सरकार काहीचं करत नाही, राज्य सरकार संप चिघळवतेय म्हणून आम्ही दोन पावलं पुढे आलो आणि कामगारांसमोर हा पर्याय ठेवला. काही कामगारांनी हा निर्णय मान्य केला,मात्र काही कामगार विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अडून आहेत. परंतु विलिनीकरणाचा मुद्दावर हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोरचं निर्णय होईल, त्यामुळे १२ आठवडे संप लांबवता येणार नाही. संप मिटवून विलिनीकरणाच्या मुद्दावर जेव्हा समितीचा अहवाल येईल तेव्हा पुन्हा एकदा चर्चा करु, असं आश्वासन अनिल परब यांनी दिले आहे.

काही कामगार आजही तंबू टाकून बसलेले आहेत. ते येणाऱ्या कामगारांना अडवतायत. परंतु आजपासून त्यांना आम्ही हमी दिली की, कामावर या. जे कामगार अडवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोर्टाने म्हटले की, जे कामगार कामावर जाऊ इच्छितात त्यांना कामावर जाण्यापासून अडवू नये. कामावर रुजू होणाऱ्या कामगारांना अडवणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा इशारा परब यांनी दिला.

१२ तासांच्या अल्टिमेटमनंतर जे कामगार येत आहेत किंवा नाही यांची यादी तयार केली जात आहे, त्यानंतर स्वरुप ठरवले जाईल. यासाठी अनेक पर्यायांवर चर्चा सुरु आहे. राज्य शासन म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टींची तयारी करु ठेवली आहे, असेही परब म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button