आरोग्यशिक्षण

राज्यात शाळा, कॉलेजेस पुन्हा बंद होणार? १५ दिवसांतील परिस्थिती बघून सरकार घेणार निर्णय

मुंबई : देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शाळा कॉलेजेस सुरु झाले होते. मात्र आता कोरोनच्या नव्या व्हेरिएन्टनं परत चिंता वाढवली आहे.

राज्यात बघता बघता ओमिक्रोनचे रुग्ण वाढत चालले आहेत. जर ओमिक्रोन असाच राज्यात वाढत राहिला तर सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागतील असा इशारा काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला होता. आता मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा शाळा कॉलेजेस बंद होणार का याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात बघता बघता ओमिक्रोन रुग्णांची संख्या तब्बल १६७ वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आता सतर्क झालं आहे. पुढच्या पंधरा दिवसांमधील एकूण स्थिती बघूनच शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

राज्यात अहमदनगर, सांगली आणि इतर काही जिल्ह्यांमधील शाळांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस ऑफलाईन सुरु करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणं पर्याय नसेल एवढं मात्र नक्की. लोकांना मास्क घालण्याची गरज आहे. आतापासून पंधरा दिवसांची परिस्थिती पाहता शाळा-कॉलेजबाबत निर्णय घेतला जाईल. आता सुट्टीचा हंगाम आहे. त्यामुळे पर्यटन परिसर बंद करणं ही चांगली कल्पना ठरणार नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांमध्येच विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र पुढील पंधरा दिवसात पुन्हा शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आलेत तर विद्यार्थ्यांना लसीकरण केंद्रांवर जाऊनच लस घ्यावी लागणार आहे. एकूणच शाळांसाठी, विद्यार्थ्यांसाठी पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे असणार आहेत. राज्यातील शाळा आणि कॉलेजेस तसेच सुरु ठेवायचे की बंद करायचे याबाबत निर्णय यादरम्यान घेण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button