जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिका विजयासाठी ३०५ धावसंख्येचा पाठलाग करत आहे. त्यांना आणखी २११ धावांची गरज आहे. दुसरीकडे भारताला या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवायचा असेल तर आणखी ६ विकेटची गरज आहे. सेंच्युरियनच्या या मैदानावर ३०५ धावांचे लक्ष्य सोपे नाही. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर कोणलाही संघ चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिका संघ ४ बाद ९४ वर खेळत होता. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार डीन एल्गरने ५२ धावा केल्या असून तो नाबाद खेळत आहे. भारतासाठी जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताचा डाव चौथ्या दिवशी १७४ धावात आटोपला. पहिल्या डावातील आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही २११ धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार डीन एल्गर अजूनही मैदानावर आहे आणि तीच भारतासाठी मुख्य अडचण आहे. त्याने दिवसाच्या अखेरच्या सत्रात शानदार अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेने मार्करम, कीगन पीटरसन आणि सारी वॅन डर यांच्या विकेट गमावल्या आहेत. दिवसातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने केशव महाराजला बाद करुन भारताला मोठा दिलासा दिला.
दुसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या असून शामी आणि सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे. उद्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला तर सेंच्युरियनवरील तो भारताचा पहिला विजय ठरेल. याआधी भारताने दोन्ही सामने गमावले आहेत. सेंच्युरियनच्या या विकेटवर गोलंदाज धाक ठेवतील अशी स्थिती आहे. कारण चेंडूला मध्येच उसळी मिळतेय, तर कधी चेंडू खाली राहतोय.
भारतीय फलंदाजांकडून निराशा
पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. कागिसो राबाडा, लुंगी निगीडी आणि मार्को जॅनसेन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव १७४ धावात आटोपला. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे या मधल्या फळीतीली फलंदाजांनी निराश केले. भारताकडून कुणीही अर्धशतकी खेळी केली नाही. ऋषभ पंतने सर्वाधिक (३४) धावा केल्या. मागच्या डावातील शतकवीर केएल राहुल (२३) धावांवर बाद झाला. विराट कोहली (१८), चेतेश्वर पुजारा (१६) आणि अजिंक्य रहाणे (२०) धावांवर बाद झाले. राबाडा, जॅनसेनने प्रत्येकी चार तर निगीडीने दोन विकेट घेतल्या.
मैदानाचा इतिहास
विशेष म्हणजे या मैदानावर शतकभराच्या काळात केवळ एकदाच चौथ्या डावात ३०० पेक्षा अधिकच्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला आहे. त्यामुळे आफ्रिकेलाही हा पाठलाग कठीण जाईल, असं बोललं जातंय. त्यामुळेच भारताच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अंतिम निकाल दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीवरच अवलंबून असणार आहे. या मैदानाच्या इतिहासात एकदाच २००१-०२ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत सामन्यावेळी ३०० पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं होतं.