राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगड मारला कशावरून? : अजित पवार
जरंडेश्वर कारखान्याची विक्री उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार
पुणे : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पडळकरांच्या तोडफोड प्रकरणावर भाष्य केले आहे. पवार म्हणाले, पडळकरांना आम्हीच विरोधक आहोत. म्हणून ते आमच्यावरच आरोप करणार आहेत. त्यांच्या गाडीवर दगड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारला कशावरून? काहीवेळा असंही होतं की, बरेच जण स्वतःचंच नुकसान करतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. काय सांगता येतं..? मी विचारांची लढाई विचारांनीच लढावी असं माझं मत आहे.
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवारांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती.गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.गाडीवर हल्ला करणारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामलाल चौकातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे.
जरंडेश्वर कारखान्याची विक्री उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार
साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्याची विक्री ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती, त्यामध्ये कारखान्यातील संचालक मंडळाचा कोणताही हात नव्हता असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ईडीने कारखान्यावर केलेली ही कारवाई पहिलीच नाही, या आधीही अशा कारवाया झाल्या आहेत, त्यातून काहीही निष्पन्न झालं नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन या कारखान्याची विक्री केल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारखान्याची विक्री झाल्याचं सांगत अजित पवार म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा कारखाना बीव्हीजी कंपनीने चालवायला घेतला. पण त्यांना पहिल्या वर्षी मोठं नुकसान झाल्यानं माझ्या एका नातेवाईकाने, राजेंद्र घाडगे यांनी तो चालवायला घेतला. रितसर परवानग्या घेऊन त्यांनी हा कारखाना चालू केला होता. ३०० ते ४०० कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी हा कारखाना उभा करण्यासाठी काढले होते. परंतु ईडीने त्यावर टाच आणली. आता ही टाच का आणली याच्या खोलात मी जात नाही. एखाद्या एजन्सीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडी, एसीबी यांनी चौकशी केली आहे. त्यात त्यांना काही आढळले नाही. पण ईडीने नेमकी कशासाठी चौकशी सुरु केली हे अद्याप कळाले नाही. अनेक कामगारांचे भवितव्य या कारखान्यावर अवलंबून आहे. त्यामुळे वकिलाचा सल्ला घेऊन कंपनीवर असणारे डायरेक्टर कोर्टात जातील असंही अजित पवारांनी सांगितलं.