मुंबई-गोवा हायवेवर काळे फासणारे, चिखलफेक करणारे तुमच्याबरोबर, तिथे तुम्ही गप्प का?
खा. अरविंद सावंत यांचा नितीन गडकरींना सवाल
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल अत्यंत स्फोटक पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याची तत्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहेत. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी, मुंबई-गोवा रोड आम्ही करतोय का? काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे, चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्या बरोबर आहेत. तिथे तुम्ही गप्प का? असा सवाल गडकरींना केला आहे.
माननीय नितीन गडकरी यांचा पूर्ण आदर आहे, पण त्यांनी शिवसेना शब्द वापरण्याऐवजी त्या एका विशिष्ट भागाचा उल्लेख केला असता, तर बरं झालं असतं. पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख केला. जणू काही शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रस्ते बांधणीच्या कामाला विरोध करत आहे, असा सूर त्या पत्रातून व्यक्त होतोय, ते गैर आहे असं मला वाटते, असं अरविंद सावंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी तर अलिकडेच नितीन गडकरींचा गौरव केलेला आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट तर गडकरींचा उल्लेख रोडकरी करत, इतकं त्यांचं डायनॅमिक व्यक्तिमत्व आहे. जी कुठली घटना घडली आहे त्याची मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेतली आहे. घटनेची पोलीस महासंचालकांना चौकशी करायला सांगितली आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.
अखंड शिवसेनेबद्दल असं विधान करणे अयोग्य आहे. कारण काही माणसे आज गडकरींसोबत आहेत, ज्यांनी मुंबई गोवा रोडवर तुमच्याच अधिकाऱ्यांना काळे फासण्याच्या घटना घडल्या. ते करणारे आज तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना करते, असे चित्र उभे करू नका. मुंबई गोवा महामार्गाची आज काय अवस्था आहे ते पाहा, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.
चौकशीत ते खरे शिवसैनिक आहेत की आमच्या नावाने कुणी बोंबाबोंब करते, ते बाहेर येईल. त्यांनी जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये होते, असं म्हटलं पाहिजे होतं. शिवसेना का म्हणता? मुंबई गोवा रोड आम्ही करतोय का? काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे, चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्याबरोबर आहेत. तिथे तुम्ही गप्प का?, असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारलं. विकासाच्या कामाला कुणी विरोध करता कामा नये ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची न्याय भूमिका आहे आणि ते त्यापद्धतीने न्याय देतील, अशी हमीही त्यांनी दिली.