कोणाचे तळवे चाटून कंगनाला ‘पद्मश्री’ मिळाला, ते साऱ्या दिल्लीला माहिती आहे : खा. तुमाने
नवी दिल्ली: देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालंय, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतनं आता महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. गांधींनी कधीही भगतसिंह, नेताजी बोस यांना पाठिंबा दिला नाही. थप्पड खाऊन स्वातंत्र्य मिळत नाही, अशी विधानं केल्यानं कंगना वादात सापडली. कंगनाच्या विधानांचा समाचार घेताना शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
महात्मा गांधींना सत्तेची लालसा होती, असं विधान कंगनानं केलं होतं. त्यावर सत्तेची लालसा असती, तर महात्मा गांधी पंतप्रधान, राष्ट्रपती काहीही होऊ शकले असते, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार तुमाने यांनी दिलं. कंगना राणौतला कशामुळे पद्मश्री मिळालाय, कोणाचे तळवे चाटून पुरस्कार मिळालाय, ते दिल्लीत सगळ्या खासदार, आमदारांना माहीत आहे, असं आक्षेपार्ह विधानही त्यांनी केलं.
कंगना राणौतनं इन्स्टाग्रामवर एक न्यूज कटिंग आणि दोन मोठे संदेश पोस्ट केले. यामध्ये कंगनानं आपल्या आधीच्या विधानाबाबत भूमिका मांडली आहे. पहिल्या मेसेजमध्ये कंगना म्हणते की, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते, ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचं रक्तही उसळलं नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असं स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर दुसऱ्या मेसेजमध्ये कंगना रणौत म्हटलं की, गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना समर्थन दिलं नाही. भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाचे समर्थन करावं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण या सर्व गोष्टी मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. खरं तर हे मौन अतिशय बेजबाबदार आणि वरवरचं आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्शाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, असं कंगनानं म्हटलं आहे.