मुंबई: पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने एकनाथ खडसे आणि कुटुंबियांविरोधात चौकशी सुरू केली असून, ईडीने दणका देत खडसेंच्या ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर अलीकडेच टाच आणली. यानंतर आता प्राथमिकदृष्ट्या पाहता एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदविले आहे. कोर्टाने असंही म्हटलंय की या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही की खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पार्टीचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते.
खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करुन दिला. त्यामुळे खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असे ईडी कोर्टाने स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली. यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत आता योग्य वेळ आली की सीडी लावणार असल्याचा इशारा दिला आहे. ईडी लावली तर सीडी लावेन असे मी म्हणालो होतो, हे खरे आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच हा अहवाल जाहीर करणार आहे. ईडी चौकशीवर परिणाम होईल, असे आपण बोलणार नाही. परंतु खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप खडसे यांनी केला आहे.