नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट झळ देशातील सर्वसामान्य नागरिकाला बसते. जनतेच्या खिशावर याचा परिणाम होतो. प्रवास खर्च वाढल्यानं महागाई वाढते, पण याचा मोदी सरकारला काहीच फरक पडत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. “पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत जीडीपी वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत जीडीपी वाढतोय. ते नेमकं कोणत्या जीडीपीबाबत बोलत आहेत ते मला नंतर कळलं. ‘गॅस-डिझेल-पेट्रोल’ असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केलाय”, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी यावेळी लगावला आहे.
मोदी सरकारनं गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमातून तब्बल २३ लाख कोटींची कमाई केली आहे. हा पैसा नेमका गेला कुठे?, असा सवाल राहुल गांधी यांनी सरकारला विचारला आहे. देशात डिमोनिटायझेशन आणि मॉनिटायझेशन एकाच वेळी सुरू आहे. मोदींच्या निवडक चार-पाच मित्रांचं मॉनिटायझेशन होत आहे आणि देशातील शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, एमएसएमई, नोकरदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि इमानदार उद्योगपतींचं डिमॉनिटायझेशन सुरू आहे, असाही टोला राहुल यांनी यावेळी लगावला.
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर भाष्य करताना राहुल यांनी यूपीए सरकारच्या काळातील गॅसच्या किमतीची आठवण करुन दिली. २०१४ साली जेव्हा यूपीएचं सरकार संपुष्टात आलं होतं त्यावेळी घरगुती गॅस सिलिंडरचा दर ४१० रुपये इतका होता आणि आज हाच दर ८८५ रुपये इतका झाला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल ११६ टक्क्यांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर २०१४ सालापेक्षा सध्या ४२ टक्क्यांनी आणि डिझेलचे दर ५५ टक्क्यांनी वाढले आहेत, अशी आकडेवारी राहुल यांनी सादर केली.