मुक्तपीठ

असले स्वातंत्र्य काय कामाचे ?

- दीपक मोहिते

बेड व ऑक्सिजनची कमतरता,रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार,इ.कारणामुळे आज नागरिकांच्या जीवाची घालमेल सुरू आहे,ती बघवत नाही.एका बेडवर तीन रुग्ण,तर बेड नसल्यामुळे भर रस्त्यात रुग्ण ऑक्सिजनवर,असे चित्र नित्याचेच झाले आहे.पुढील वर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पाऊणशे वर्ष पूर्ण होत आहेत.गेल्या ७५ वर्षांच्या प्रदिर्घ काळात आपण प्रचंड प्रगती साधल्याचा डंका आपले राज्यकर्ते सतत पिटत असतात.पण त्यांचा हा दावा किती खोटा आहे,हे कोविड १९ च्या जीवघेण्या विषाणूने सिद्ध केले आहे.शिक्षण,आरोग्य व साक्षरता क्षेत्रात आपला देश किती मागासलेला आहे,हे या कोरोनाने उघड केले आहे.

मुंबई शहराची लोकसंख्या आजच्या घडीस दोन कोटीच्या घरात पोहोचली आहे.परंतु त्या प्रमाणात सरकार सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करू शकली का ? तर या ज्वलंत प्रश्नाचे उत्तर “नाही”,असेच आहे.मुंबईत उभारण्यात आलेल्या १४ हॉस्पिटल्सपैकी १० हॉस्पिटल्स ब्रिटिशांनी उभारली आहेत.
गोकुलदास तेजपाल-१८७५, नायर-१९२०, मुंबई डेंटल-१९२३, केईएम-१९२६, भाटिया-१९३२, टाटा-१९४१, सैफी-१९४८, राजावाडी-१९५६, गांधी-१९५८, भगवती-१९६२.
यामध्ये काही हॉस्पिटल्स विश्वस्त संस्थांनी उभारली आहेत.मग स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने किती रुग्णालये बांधली? १९४७ ते २०२१ या ७४ वर्षात एकाही सरकारने आरोग्य सेवेचे मूल्यमापन केले नाही.वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्याची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करणे,आवश्यक होते.पण तसे झाले नाही.सध्या राज्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यामध्ये समाधान मानत आहेत.परंतु हेच सारे,या बजबजपुरीला कारणीभूत आहेत.वैद्यकीय सोयी-सुविधा ही प्राथमिक गरज असते,हे वास्तव ज्यांच्या ध्यानीमनी नाही,अशा मुर्दाड राज्यकर्त्यांना आपण आजवर निवडून देत आलो.कोण इंजेक्शन व ऑक्सिजन पळवतो तर कोण औषधाच्या काळ्याबाजारात गुंतला आहे.आजच्या घडीला केईएम,जे.जे,सेंट जॉर्ज,सायन हॉस्पिटल्स सारखी किमान १० ते १५ हॉस्पिटल्सची गरज आहे.

सध्या जे काही चाललंय,ते पाहता,” तहान लागली विहीर खणायची,” असा प्रकार सुरू आहे.येणारा काळ अत्यंत खडतर आहे तो लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून,या अस्मानी संकटाला सामोरे जाण्याची नितांत गरज आहे.पण राजकीय स्वार्थ,हा लोकांच्या जिवापेक्षा मोठा असल्यामुळे आपल्याला आता स्मशानातही जागा मिळणार नाही.” जिवंतपणी जगण्याने छळले,तर मरणाने मृत्यूनंतरही सुटका केली नाही,”असे म्हणायची पाळी तुम्हा-आम्हावर येणार आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button