अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या स्वरूपावरून खासदार संभाजीराजे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील मतभेद वाढत चालल्याचे दिसून येत आहे. कोपर्डी येथील भेटीच्या वेळी पत्रकारांनी पाटील यांच्यासंबंधी प्रश्न विचारताच संभाजीराजे भडकले. मराठा आरक्षणाच्या लढ्यात चंद्रकांत पाटलांचे योगदान काय, असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. आपल्याला कोणी शिकविण्याची गरज नाही, आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार आहोत, असा टोलाही त्यांनी लागवला.
खासदार संभाजीराजे आज कोपर्डीला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा व्हावी, मराठा आक्षणाचा लढा कसा होणार, यासंबंधी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. मात्र, चंद्रकात पाटील यांच्यासंबंधी प्रश्न विचारताच ते चांगलेच भडकलेले दिसले. गेल्या काही दिवसांपासून पाटील संभाजीराजे यांच्या भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित करीत आहेत. याशिवाय संभाजीराजे भाजपपासून दुरावल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
या संबंधीच्या प्रश्नांना उत्तरे देताना संभाजीराजे म्हणाले, मी २००७ पासून मराठा समाजाच्या लढ्यात आहे. चंद्रकांत पाटील यात केव्हा आले हे मला माहिती नाही. ते तुम्ही त्यांनाच विचारा. त्यामुळे कोणी काही शिकविण्याची गरज नाही. ते मी ऐकण्याचेही कारण नाही. हा सल्ला जर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस देत असतील तर मी ऐकू शकतो. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. काल परवापासून सर्वांनाच संभाजीराजे दिसू लागलेत. देवाचे मंत्र म्हणायचे असते, तर हे सगळे संभाजीराजेंचा जप करीत आहेत. कोणाच्या मनात काय आहे, हे त्यांनाच विचारले पाहिजे, मला कसे सांगता येईल? मी छत्रपती शिवराय आणि शाहू महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाच्या निमित्ताने जनतेला वेठीस धरण्याचे काम मुळीच करणार नाही. हा लढा कायेदशीर आणि सनदीशीर मार्गाने सुरू राहिला पाहिजे. एककीडे तो लढा देताना अंतिम निकाल लागेपर्यंत तात्पुता दिलासा देता आला पाहिजे. सरकारच्या हातातील ज्या पाच गोष्टी आहेत, त्या आम्ही मांडल्या आहेत. त्यासाठी सर्व समाजाला वेठीस धरण्यापेक्षा लोकप्रतिनिधींनी तो सोडवावा, असा आमचा अग्रह आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटलांनी पुन्हा डिवचले
पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना टोला लगावला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे जरी मान्य करत नसते तरी ते ऑनपेपर भाजपचे खासदार आहेत. ते भाजपचे नेते आहेत, असा टोला लगावत चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनात चालढकल करणे आम्हाला अजिबात मान्य नाही, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलनप्रश्नी आक्रमकपणा सोडून ते निर्णयाची वाट पाहतो असे म्हणत संयमी धोरण स्वीकारत आहेत. हे आम्हाला मान्य नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.