Top Newsराजकारण

संजय राऊत – राहुल गांधी यांची दिल्लीत सव्वा तास बैठक

नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीची माहिती खुद्द संजय राऊत यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी आज भेट झाली असून त्यांच्यासोबत महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासोबत राज्य सरकारच्या कामाबाबत राहुल गांधी यांनी समाधान व्यक्त केल्याचंही राऊत यांनी नमूद केलं आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी यावेळी शिवसेनेची जडणघडण आणि एकंदर कार्यपद्धतीची माहिती त्यांनी जाणून घेतल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीमधील कुरबुरीची चर्चा सुरू असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. १२ तुघलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जवळपास सव्वा तास बैठक झाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची पहिलीच वन-टू-वन बैठक होती.

गेल्या काही दिवसात राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये मतभेद झाल्याचे दिसून आलं होतं. खासकरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील या घडामोडींनंतर आजची राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button