राजकारण

पश्चिम बंगालपाठोपाठ उत्तर प्रदेशात भाजपला धक्का

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील पराभवाची जखमी ताजी असतानाच भाजपची झोप उत्तर प्रदेशमधील पंचायत निवडणुकांनी उडवली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या महिन्यात चार टप्प्यात झालेल्या पंचायत निवडणुकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वाराणसी, अयोध्या आणि मथुरा याठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात या जिल्ह्यांत मोठी पसंती दर्शविली आहे. भाजपा सरकारच्या अजेंड्यात प्रामुख्याने समाविष्ट असलेल्या या तीन जिल्ह्यांमध्ये समाजवादी पार्टी आणि बसपाचा विजय मोठा राजकीय संदेश देत आहे.

अयोध्येत पराभव

अयोध्येत जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. अयोध्येत जिल्हा पंचायतीच्या ४० जागा आहेत, त्यापैकी समाजवादी पक्षाने २४ जागा जिंकल्या आहेत, तर भाजपला फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. एवढेच नव्हे तर येथे १२ अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. अयोध्येत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने भाजपला धक्का सहन करावा लागला आहे. कारण पक्षानं तिकीट न दिल्यानं एकूण १३ जागांसाठी बंडखोर मैदानात उतरले होते. आश्चर्य म्हणजे एकीकडे अयोध्येत राम मंदिर बांधले जात आहे, तर दुसरीकडे जनतेने भाजपाला नापसंती दर्शवली आहे.

काशीमध्ये सपाचा बोलबाला

अयोध्येनंतर काशीमध्ये देखील जिल्हा पंचायत निवडणुकीचे आकडे भाजपसाठी चिंताजनक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदीय मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्ये जिल्हा पंचायतच्या ४० जागा आहेत, त्यापैकी सपाचे १४, भाजपचे ८, अपना दल (एस) च्या ३, आम आदमी पार्टी आणि उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने एक-एक अशा जागांवर विजय मिळवला आहे. तीन जागांवर अपक्षांनी विजय मिळविला आहे. एवढेच नव्हे २०१५ मध्ये काशीमध्ये भाजपचा पराभव झाला होता, परंतु योगी सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हा पंचायत भाजपने सपाकडून काढून घेतली होती.

मथुरेत केवळ ८ जागांवर विजय

मथुरेच्या विकासासाठी योगी सरकारने कंबर कसल्याचं सांगितलं जातं, मात्र आकडेवारी काहीतरी वेगळं सांगत आहे. भाजपसाठी एक गंभीर राजकीय संदेश यातून दिला जात आहे. मथुरेत बसपाने १२ जागांवर बाजी मारली आहे. तर आरएलडीने ९ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला याठिकाणी केवळ ८ जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय सपाने १ जागा तर ३ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत.

काशी, अयोध्या आणि मथुरा हे भाजप सरकारच्या अजेंड्यावर आहेत. या शहरांना धार्मिक कारणांमुळे देखील महत्त्व आहे. विकासाच्या दृष्टीने अनेक घोषणा या शहरांसाठी केल्या जात आहेत. परंतु पंचायत निवडणुकीत भाजपाचा पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. इतकेच नाही तर २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून युपी पंचायत निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. यामध्ये समाजवादी पक्षाने जोरदार झुंज दिली आणि आपली ताकद दाखवून दिली आहे. बसपाने देखील बर्‍याच ठिकाणी बाजी मारली आहे, मात्र अधिकांश ठिकाणी काँग्रेसची कामगिरी निराशाजनक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button