विकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू निरुपयोगी; तिसऱ्या लाटेचा सामना अनिवार्य : डॉ. गुलेरिया
नवी दिल्ली: एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशाला सावधानतेचा मोठा इशारा दिला आहे. भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार आहे. नाईट कर्फ्यू, विकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
‘इंडिया टुडे’ने डॉ. रणदीप गुलेरिया यांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. कोरोना महामारी अशीच वाढत राहिली आणि इम्यून एस्केप मॅकेनिझ्म विकसित करण्यात यशस्वी झाल्यास भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पर्याप्त कालावधीसाठी लॉकडाऊन करण्याची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सध्या तीन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णालयाती वैद्यकीय सेवेत सुधारणा घडवून आणणे, कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि लसीकरणाची मोहीम गतीमान करणे. या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. क्लोज कॅन्टॅकेट कमी करण्यात यश आलं तरी देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, असं गुलेरिया यांनी सांगितलं.
सध्या विकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू लावण्याची काही गरज नाही. लॉकडाऊन काही काळासाठी लावावाच लागणार आहे. कोरोनाचा व्हायरस ज्या पद्धतीने विकसीत होत आहे. त्यावरून देशात तिसरी लाट येण्याची शक्यता बळावली आहे. लोकांची इम्युनिटी वाढवण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.