आज २७ जुलै उद्धवजी ठाकरेंचा वाढदिवस. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस. खरं म्हणजे तो धुमधडाक्यात साजरा व्हावा अशीच सर्वांची (अपवाद असू शकतात.) इच्छा असणार, पण उध्दवजींना मुळातच भपकेबाजपणा आवडत नाही. तरीही कार्यकर्त्यांचा फसफसता उत्साह आवरणे त्यांनाही कठीणच गेलं असतं ; पण आपला महाराष्ट्र अस्मानी संकटाने वेढला गेलेला असतांना, रयतेच्या राजाने सर्व कार्यकर्त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाला लगाम घालून आपण खरोखरच बाळासाहेबांचे पुत्र आहोत, प्रजाहितदक्ष शिवरायांचे प्रतिनिधी आहोत हे सिद्ध करून दाखविले आहे. रात्रभर राज्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन उशिरा झोपलेले उध्दवजी सकाळी लवकर उठून स्नानादी कर्मे आटोपून बाळासाहेबांच्या तसबिरीसमोर हात जोडून उभे आहेत. आज आशीर्वाद द्यायला, मार्गदर्शन करायला बाळासाहेब हवे होते, असा विचार मनात येताच त्यांचे डोळे भरून येतात. ते डोळे मिटून बाळासाहेबांचं स्मरण करतात. तोच बाळासाहेबांचा धीरगंभीर आवाज त्यांच्या कानात घुमतो, ‘ आम्ही आलो रे !’
उध्दवजी आवाज कुठून आला म्हणून डोळे उघडून बघतात, तर तो बाळासाहेबांच्या तसबिरीतून आल्यासारखा वाटतो आणि अंगठ्यात रुद्राक्षाची माळ अडकवलेला बाळासाहेबांचा हात उध्दवजींच्या डोक्यावर स्थिरावतो.बाळासाहेब आपल्या धीरगंभीर आवाजात बोलू लागतात. बाळासाहेबांच्या धीरगंभीर आवाजासोबतच अगरबत्तीचा मंद सुगंध दरवळू लागतो. ‘ दैवगती मोठी विचित्र असते रे उध्दवा. मोठी विचित्र असते, पण दैवगतीपुढे हार पत्करेल तो माझा पुत्र म्हणवूच शकणार नाही. आज तुझं यश पाहायला मी हवा होतो रे. मी असेपर्यंत बाळासाहेबांचा पुत्र म्हणून जगलास, ओळखला गेलास. आता मला उध्दव ठाकरेंचे पिताश्री म्हणून जगायचं होतं रे. उध्दव ठाकरेंचे पिताश्री म्हणून माझी ओळख ठेवून मी मृत्यूला कवटाळलं असतं तर परत कोणताच जन्म घेण्याचं नाकारलं असतं रे. पण काही गोष्टी नशीबातच नसतात रे. जाऊ दे.तुझ्यात या बाळासाहेबांचं रक्त आहे, वाघाचं काळीज आहे हे तू सिद्ध करतोयस याचाच मला आनंद आहे. अरे, कितीही विरोध होऊ दे, कितीही कस लागू दे. लक्षात ठेव कस सोन्यालाच लावला जातो. जबाबदारी समर्थ खांद्यांवरच टाकली जाते. आपण एकवेळ चुकतो माणसं ओळखायला, माणसं निवडायला, पण नियती कधीच चुकत नसते. महाराष्ट्रावर ही सर्व संकटं येणार होती म्हणूनच नियतीने या रयतेचा राजा, रक्षणकर्ता म्हणून तुझी निवड केली आहे. तू ती सार्थ ठरवशीलच याची नियतीला जितकी खात्री असेल ना तितकीच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच ती मला आहे. शूद्र विरोधाकडे लक्ष देऊ नकोस. ‘निंदकाचे घर असावे शेजारी – -‘ असं तुकाराम महाराजांनी काही उगीच म्हणून ठेवलेलं नाही. शिवरायांचा लढा जसा परकीयांसोबतच स्वकीयांशीही होता, तसाच तो तुझाही आहे. काही समज गैरसमज असतात ते कालांतराने दूर होतात. त्यात गुंतून न पडता जो रयतेच्या कल्याणासाठी झटतो तो खरा राजा. काळाच्या कसोटीवर तू खरा उतरशील याची मला खात्री आहे. माझे आशीर्वाद, जनतेचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. यशस्वी हो. दीर्घायुषी हो.’ प्रसन्न चित्ताने उध्दवजी कामाला लागतात.