आरोग्य

नागरिकांनी सहकार्य न केल्यास कडक लॉकडाऊनचा इशारा

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचं पाहून आता आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. पुण्याचे पालकमंत्री आणि अजित पवार तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नागरिकांनी सहकार्य न केल्यास कडक लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले, राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. मागच्या वेळी वाहतुक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. पण अजून सुद्धा काही जण या सूचनांचा विचार न करता बाहेर घराबाहेर पडत आहेत. यामुळेच आता निर्बंध अजून कठोर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. तशा सूचना स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. पोलीसांना संयमाने काम करण्याच्या सूचना आहेत. पण त्यांना कडक पावलं उचलण्याची वेळ येऊ देऊ नका. नागरिकांनी नियमांचे पालन करा आणि पोलिसांना सहकार्य करा असेही मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले, “आपल्याकडे मर्यादित पोलीस फोर्स आहेत. रात्रंदिवस पोलीस काम करत आहेत. माझं जनतेला आवाहन आहे की तुमच्याकडून जी मदत असेल ती पोलिसांना द्या. पाणी, चहा, शक्य झालं तर काही खायला द्या. पोलिसांकडे डब्बे आहेत पण सामाजिक भावनेच्या जाणिवेतून तुम्ही त्यांना पाठबळ द्या”

अजित पवारांचा इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना कडक लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भात एक इशाराच दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. पुणेकर गर्दी करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. कडक लॉकडाऊनची वेळ येऊ नये. मात्र, नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर नाईलाजास्तव कडक लॉकडाऊन लावण्यात येईल. याआधीच मंत्रिमंडळातील सहकारी मागणी करत आहेत तशाच प्रकारे निर्णय मग घ्यावा लागेल.

राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. इतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही यासबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. रिलायन्स समूहाकडून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. मुकेश अंबानी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला असून रिलायन्सकडून सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button