खडसेंची सीडी कधी बाहेर येतेय, त्याची वाट पाहतोय : राज ठाकरे
पुणे : माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीत मनसे ‘एकला चलो रे’ असणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी फार बोलण्याचे टाळले. त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मोघम वक्तव्य त्यांनी केले. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला.
पुन्हा एकदा ‘मिशन नाशिक’
पुण्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे हे १६, १७, १८ जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. नाशिक हा मनसेचा जुना बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे.
नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता राहिली आहे. त्यावेळी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं केल्याचा दावा मनसेकडून केला जातोय. मात्र, असं असलं तरी नाशिककरांनी मनसेला दुसऱ्यावेळी नाकारल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा रोवण्यासाठी राज ठाकरे सरसावले असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या ३ दिवसांच्या दौऱ्यात राज ठाकरे संघटनात्मक मोठे निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांचा नाशिक दौरा होत असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.