राजकारण

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवले; शिवसेनेची टीका

कुडाळ : भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केले, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसांनी केल्याची टीका शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी केली आहे.

विनायक राऊत यांनी भाजपमधील धुसफुशीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. ओबीसी समाजाला आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा आधारवड म्हणून मुंडे कुटुंबीयांकडे पाहिजे जाते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजा यांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले आहेत. त्याचबरोबर एकनाथराव खडसे यांना बाद करून टाकलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे होते, त्या सर्वांना फडणवीसांच्या माध्यमातून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. आजही भाजपने पंकजा मुंडेना राजकारण आणि समाजकारणाच्या बाहेर फेकून दिलं आहे, असा सणसणीत आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपाने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रीपद दिलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असेल. नारायण राणे यापूर्वी मंत्री असताना सुद्धा त्यांना सिंधुदुर्गात पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचा जो हिसका आहे, त्याचा अनुभव राणेंनी घेतलेला आहे, असं सांगतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत राणेंकडून काही फायदा होणार नाही. मागच्या ३० वर्षांपासून मुंबईत शिवसेना जे काम करते आहे, त्या विश्वासावर पुनश्च एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी २०२४ मध्ये मुंबईवर भगवा फडकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button