राजकारण

राज्यसभेत विरोधी खासदारांना झालेल्या धक्काबुक्कीचा व्हीडिओ व्हायरल

नवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांचे खासदार आणि मार्शलांमध्ये काल धक्काबुक्की झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, आता या धक्काबुक्कीचा व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये मार्शल राज्यसभा खासदारांची वाट अडवताना दिसत आहेत. या खासदारांनी अनेकदा सांगितल्यानंतरही मार्शल बाजूला न झाल्याने तिथे सुरू असलेली बाचाबाची धक्काबुक्कीमध्ये परिवर्तित झाली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पेगासस, महागाई, कृषी कायद्यांसह अनेक मुद्यांवर चर्चेची मागणी करून विरोधक गोंधळ घालत होते. त्यामुळे संसदेसच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर परिणाम होत होता. दरम्यान, बुधवारी राज्यसभेमध्ये गोंधळ घालत असलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांना रोखण्यासाठी मार्शलना पाचारण करण्यात आल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली. दरम्यान, समोर आलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मार्शल विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेच्या वेलमध्ये जाण्यापासून अडवताना दिसत आहेत. त्यादरम्यान, दोन्हीकडून एकमेकांना समजावरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मात्र त्यातून मार्ग न निघाल्याने तिथे धक्काबुक्की होताना दिसत आहे.

बुधवारी वादग्रस्त सामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) संशोधन विधेयक २०२१ राज्यसभेमध्ये गोंधळादरम्यान पारित करण्यात आले. मात्र विरोधकांकडून हे विधेयक अभ्यासासाठी समितीकडे पाठवण्याची मागणी करत होते. या मागणीवर सर्व विरोधी पक्ष एकजुट होता. वायएसआर काँग्रेसच्या विजयशेट्टी रेड्डी यांनीही या विधेयकाला व्यापक प्रभावाने समजून घेण्यासाठी प्रवर समितीकडे सोपवण्याची मागणी केली होती.

या गोंधळादरम्यान सरकारने या विधेयकावर चर्चा करण्यासाठी दबाव टाकला. तेव्हा सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम यांनी समोरील बेंचवर चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कामकाज पाहत असलेले बीजेडी खासदार सस्मित पात्रा यांनी त्वरित सभागृहाचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर १० हून अधिक महिला मार्शल आमि ५० हून अधिक पुरुष मार्शलनी रिपोर्टरच्या मेजसमोर कडे केले. तसेच त्यांनी विरोधी खासदारांचा वेलमध्ये जाण्याचा मार्ग अडवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button