राणेंच्या बंगल्याचीही पाहणी करा; आ. वैभव नाईकांचे किरीट सोमय्यांना आव्हान
सिंधुदुर्ग : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील निर्माणाधीन बंगल्यावर हातोडा पडला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या उद्या या कारवाईची पाहणी करण्यासाठी दापोलीला जाणार आहे. त्यावरून शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमय्यांवर टीका केली आहे. सोमय्या यांनी केवळ नार्वेकरांच्या बंगल्यांचीच पाहणी करू नये. तर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यांचीही पाहणी करावी, असं आव्हानच वैभव नाईक यांनी सोमय्यांना दिलं आहे.
वैभव नाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे. मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेल्या बंगल्याचे पडलेले बांधकाम पाहायला येण्याआधी नारायण राणे यांचा जुहूमधील ‘अधीश’ बंगला आणि सिंधुदुर्गात केलेल्या अनधिकृत बांधकामाचीही पाहाणी करावी, असं आव्हानच नाईक यांनी दिलं आहे.
नार्वेकरांनीच पाडले बांधकाम
दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून हा बंगला बांधण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यता आले. जेसीबी मशीन लावून हा बंगला तोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे नार्वेकर यांनी स्वत: हे बांधकाम पाडून घेतलं आहे. किरीट सोमय्या यांनी या तोडक कारवाईचा व्हिडीओ ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच हा बंगला किती प्रमाणात तोडला याची पाहणी करण्यासाठी सोमय्या स्वत: दापोलीत जाणार आहेत.
दरम्यान, आज नार्वेकर यांचा बंगला तोडण्यात आला आहे. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी तसं ट्विट केलं आहे.