मुंबईत आजपासून लसीकरण सुरु
मुंबई : मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर आजपासून म्हणजेच, सोमवारी पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे. मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरु असणार आहे. सध्या मुंबईत १ लाख ३५ हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. मात्र, पुढील दोन दिवस हे डोस पुरतील. कारण दररोज कोविशील्ड लसीचे ४०-५० हजार डोस मुंबईकरांना दिले जातात. त्याच वेळी, कोवॅक्सिन लसीचे १५ हजार डोस दररोज दिले जातात. मंगळवारपर्यंत लसीचा पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. सध्या कोविशिल्डचे ८५ हजार डोस आणि कोवॅक्सिनचे ५० हजार डोस उपलब्ध आहेत.
मुंबईतील कोरोना लसीकरण मोहीम शुक्रवारपासून ठप्प होती. पुरेशा लसींच्या साठ्याअभावी शुक्रवारी मुंबईतील लसीकरण बंद असेल असं मुंबई महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. तसेच शनिवारीही लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली होती. तर रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे लसीकरण बंद होतं. अशातच आज (सोमवारी) अवघ्या तीन दिवसानंतर मुंबईतील लसीकरण सुरु होणार असून आज सर्व लसीकरण केंद्र सुरु राहणार आहेत.